सातत्याने डोकेदुखीचा त्रास हा तोंडातील जिवाणूंमुळेच होत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. काही विशिष्ट खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे तोंडातील जिवाणूंमध्ये वाढ होऊन हा त्रास होतो.

काही पदार्थामध्ये नायट्रेट असते आणि जिवाणूंचा या नायट्रेटच्या प्रक्रियेत सहभाग असतो. त्यामुळे नायट्रिक ऑक्साइड तयार होते. त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. या नायट्रिक ऑक्साइडमुळे रक्तवाहिन्या आणि रक्तपुरवठय़ावर प्रभाव पडतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो. हिरव्या भाज्यांमध्ये नायट्रेट आढळते.

अमेरिकेतील एका संस्थेने या विषयासंबंधी संशोधन केले आहे. १७२ जणांच्या तोंडात संशोधकांना जिवाणू आढळले. त्याचप्रमाणे एक हजारापेक्षा अधिक व्यक्तींमध्ये नायट्रेटची प्रक्रिया पुढे जाऊन डोकेदुखी होत असल्याचे आढळून आले. डोकेदुखी, उलटी होणे, आवाजाचा त्रास होणे, अशी लक्षणे संशोधकांना आढळून आली आहेत. कॅनडात आठ टक्के लोकांमध्ये हा आजार आढळून आला आहे. अभ्यासकांकडून या विषयासंबंधी आणखी संशोधन सुरू आहे. हे संशोधन नुकतेच अमेरिकेतील एका मासिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)