गेल्या काही वर्षांमध्ये मोबाइल वर्ल्ड काँग्रेसचे प्रस्थ वाढले आहे. याआधी प्रत्येक कंपनी आपल्या फोनचे लाँचिंग वेगवेगळे करत असे. अद्यापही एखादे नवीन उत्पादन बाजारात आणायचे असेल तर कंपनी मोठ्या कार्यक्रमाद्वारे ते उत्पादन बाजारात आणते. आपल्या उत्पादनांची दखल जागतिक पातळीवर घेतली जावी म्हणून अनेक कंपन्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून जगातील प्रमुख कंपन्या येथे आपल्या नवीन उत्पादनांचे लाँचिंग करतात. बार्सेलोना येथे २७ फेब्रुवारी ते २ मार्च या दरम्यान मोबाइल वर्ल्ड काँग्रेस होणार आहे. या कार्यक्रमामध्ये एलजी, एचएमडी ग्लोबल, ब्लॅकबेरी, लेनोव्हो आणि सॅमसंग या कंपन्या आपले उत्पादन लाँच करण्यात आहेत. या प्रमुख कंपन्यांवर सर्वांची नजर असणार आहे.
नोकिया

एचएमडी ग्लोबल कंपनीकडे स्वामित्व असलेल्या नोकियाद्वारे अनेक स्मार्टफोनची घोषणा करण्यात येणार आहे. अॅंड्रॉइड नुगट या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा नोकिया ६ हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनला तिथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या फोनचे व्हेरियंट या परिषदेमध्ये लाँच करण्यात येणार आहे. नोकिया ६ भारतामध्ये मे मध्ये लाँच होईल. या फोनची किंमत १९,००० रुपये आहे.
नोकियाचा ३३१० हा फोनसुद्धा परत बाजारात येण्याची शक्यता आहे. नोकिया ३, नोकिया ५, नोकिया ८ हे स्मार्टफोन या परिषदेमध्ये लाँच होऊ शकतात.

एलजी

एलजी त्यांच्या जी ६ फ्लॅगशिप मोबाइलने सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकेल. जी ६ हा फोन बाजारात येणार याची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे. या फोनची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. २६ फेब्रुवारी रोजी एलजी जी ६ या फोनचे लाँचिंग होणार आहे. या फोनची स्क्रीन ५.७ इंची आहे.
ब्लॅकबेरी

एकेकाळी अधिकारी आणि मोठ्या व्यावसायिक वर्गाकडून या फोनला मागणी होती. परंतु नंतर अॅंड्रॉइडचा जमाना आला आणि हळुहळु या फोनचा खप कमी झाला. या कार्यक्रमामध्ये ब्लॅकबेरी आपला मरक्युरी हा फ्लॅगशिप फोन लाँच करणार आहे. अॅंड्रॉइड नुगट ऑपरेटिंग सिस्टम, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टोरेज असलेला फोन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मोटोरोला

मोटोरोलाच्या मोटो जी ५ आणि मोटो जी ५ प्लसची घोषणा या कार्यक्रमामध्ये होऊ शकते. हा फोन लाँच होण्यापुर्वीच या फोनचे फीचर्स लीक झाले आहेत. ५.२ इंची स्क्रीन, १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, २ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल स्टोरेज ही या फोनची वैशिष्ट्ये असणार आहेत.
सॅमसंग

बार्सेलोना येथील कार्यक्रमात सॅमसंग अनेक उत्पादनांचे लाँचिंग करण्याची शक्यता आहे. गॅलक्सी टॅब एस ३ हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरू शकते. काही नवे स्मार्टफोन घेऊन सॅमसंग यावेळी परिषदेला येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.