दमदार प्रोसेसर, पाच इंची स्क्रीन, तुमच्या आरोग्याची माहिती सांगणारा आणि आणखी हटके वैशिष्टय़े असणारा मोबाइल जर तुम्हाला पंधरा हजार रुपयांमध्ये मिळत असेल तर..! लेनोवोने झेड वन च्या यशानंतर त्याची पुढची आवृत्ती लेनोवो झेड टू प्लस भारतात आणली आहे. आताचे नवीन मोबाइल खूप मोठे असतात, ज्यामुळे ते जवळ बाळगणे त्रासदायक ठरू शकते. परंतु या मोबाइलमध्ये तुम्हाला पाच इंचाचा फुल एचडी डिस्प्ले दिला आहे. ज्यामुळे तुम्ही एका हाताने हा मोबाइल सहज वापरू शकता तसेच हा मोबाइल जवळ बाळगणेसुद्धा सहज शक्य आहे. लेनोवो झेड टू प्लसमध्ये कॉलकॉमचा ८२० कॉड कोर सीपीयू आणि अड्रिनोचा ५३० जीपीयू वापरला आहे, हा सीपीयू कॉलकॉमचा प्रमुख प्रोसेसर आहे आणि एवढय़ा कमी किमतीत कॉलकॉमचा ८२० प्रोसेसर मिळणारा लेनोवो झेड टू प्लस हा एकमेव मोबाइल आहे. आजकाल मोबाइलचा वापर खूप वाढला आहे, ज्यामुळे बहुतेक कामं आपण मोबाइलवरूनच करतो, तेव्हा दोनतीन अ‍ॅप एका वेळी वापरणं तसंच उच्च ग्राफिक्स असलेले गेम खेळणं हे या मोबाइलमध्ये सहज शक्य आहे. या मोबाइलचे दोन प्रकार उपलब्ध आहेत. थ्री जीबी रॅम/३२ जीबी मेमरी आणि फोर जीबी रॅम/ ६४ जीबी मेमरी. मात्र या फोनमध्ये मेमरी कार्डसाठी जागा नाही. हा मोबाइल अँड्रॉइड ६..१ या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत हा मोबाइल दोन सिम कार्डांना साहाय्य करतो, तसेच टूजी, थ्रीजी, फोरजी आणि व्हीओएलटीईला साहाय्य करतो. यात वायफाय, जीपीएस, ब्लूटुथ, एफएम, यूएसबी टाइप सी (मोबाइल चार्ज करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान असलेली वायर) आहे आणि तुम्ही तुमचा पेन ड्राइव्ह या मोबाइलला जोडू शकता. लेनोवोने या मोबाइलच्या मागील बाजूस १३ मेगा पिक्सेलचा कॅमेरा दिला असून सेल्फी काढण्याची आवड असणाऱ्यांना पुढील बाजूस कॅमेरा आठ मेगा पिक्सेलचा देण्यात आला आहे. या फोनमध्ये ३५०० एमएएच इतकी बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे एक संपूर्ण दिवस तुम्ही आरामात मोबाइल वापरू शकता. मोबाइलचा जास्तीत जास्त उपयोग करताना त्याची बॅटरी मात्र लवकर संपते आणि मोबाइल पुन्हा पूर्ण चार्ज होण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणूनच लेनोवोने या मोबाइलमध्ये जलद बॅटरी चार्ज होण्याचे तंत्रज्ञान वापरले आहे. ज्यामुळे मोबाइलची बॅटरी जलद चार्ज होते, परंतु याकरिता तुम्हाला फास्ट चार्जर विकत घ्यावे लागेल. तुम्हाला एकाच बटनावर विविध कामे करायला आवडत असतील तर लेनोवो झेड टू प्लसमध्ये पुढील बाजूस फिंगर प्रिंट सेन्सर दिला आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही मोबाइलला अनलॉक करू शकता तसेच सात विविध शॉर्टकट नियुक्त करू शकता उदा. मोबाइलच्या पुढचे बटण दोनदा दाबले की नोटिफिकेशन दिसणे इ. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे आणि त्यामुळेच लेनोवोने यू हेल्थ नावाचे अ‍ॅप मोबाइलमध्ये दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही दिवसभरात किती अंतर चाललात, किती पावले चाललात इ. माहिती उपलब्ध होते. हा मोबाइल काळा आणि पांढरा या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

फायदे:

दमदार कॉलकॉमचा ८२० प्रोसेसर ज्यामुळे तुम्ही एका वेळी विविध कामे मोबाइलवर विनाअडथळा करू शकता.

बहुउद्देशीय फिंगरप्रिंट सेन्सर.

जलद चार्जिगला साहाय्य.

यू हेल्थ अ‍ॅप

ऑनलाइन आणि दुकानांमध्ये दोन्हीकडे उपलब्ध.

तोटे:

एनएफसी (वायरलेस संपर्क तंत्रज्ञान) ला साहाय्य नाही.

या फोनमध्ये मेमरी कार्डसाठी जागा नाही, त्यामुळे तुम्ही स्टोरेज वाढवू शकत नाही.

या मोबाइलमध्ये जुनी आवृत्ती ६..१ देण्यात आली आहे.

बॅटरी मोबाइलमध्ये बंद असल्यामुळे ती वापरकर्ता स्वत: काढू किंवा बदलू शकत नाही त्यासाठी त्याला लेनोवोच्या सेवा केंद्रामध्ये जावे लागेल.

मोबाइल किंमत:

थ्री जीबी रॅम / ३२ जीबी मेमरी रु. १४,९९९/-

(फक्त ऑनलाइन उपलब्ध)

फोर जीबी रॅम/ ६४ जीबी मेमरी रु. १७,४९९/- (ऑनलाइन आणि दुकानांमध्ये उपलब्ध)

सौजन्य: लोकप्रभा