रक्तातील साखर मोजण्यासाठीची नवी पद्धत शोधण्यात आली असून, त्यात मधुमेही व्यक्तींना रोजच्या रोज सुया खुपसत बसण्याची गरज नाही. नवीन साधनाचा वापर करून वेदनारहित पद्धतीने रक्ताचे नमुने न घेताही रक्तातील साखर तपासता येते. प्रथमच जगात मधुमेही लोक बोटातून रक्त न काढता रक्तशर्करा जाणून घेऊ शकतील. २० सेंटच्या नाण्याच्या आकाराएवढे यंत्र यात वापरले जाते. फ्री स्टाईल लायबर नावाचा हा संवेदक असून, त्याची अगदी छोटी पिन हाताला लावली जाते व हाताचे स्कॅनिंग करून तुम्हाला रक्तातील साखरेचे प्रमाण समजते. हातातील हे द्रवपदार्थाचे जे थर असतात त्यांचे स्कॅनिंग करून ग्लुकोजची पातळी मोजता येते. हे यंत्र हाताला चिकटवता येते व ते पाण्याने खराब होत नाही. फक्त ते दर १५  दिवसांनी बदलावे लागते. आरपीए रुग्णालयातील एंडोक्रायनोलॉजी या संस्थेचे प्रा. स्टीफन ट्विग यांनी सांगितले, की हे यंत्र मधुमेही रुग्णांना पसंत पडले आहे. रक्तात जे ग्लुकोज असते ते पेशीबाहेर असलेल्या ग्लुकोजसारखेच असते. त्यातून शर्करा प्रमाण कळतेच, शिवाय ती कशी वाहते आहे ते समजते. बोटातून रक्त काढून आपण जे काही करतो त्यापेक्षा जास्त माहिती या नवीन यंत्राने मिळवता येते. नेहमीच्या ग्लुकोज मापकांपेक्षा अधिक अचूक असे हे यंत्र आहे. वय, बॉडी मास इंडेक्स, मधुमेहाचा प्रकार याचा शर्करा मापनात परिणाम होत नाही. या एका यंत्राची किंमत ९५ डॉलर्स आहे म्हणजे वर्षांला २४०० डॉलर्सची यंत्रे एका व्यक्तीसाठी लागतील. यंत्राचा खर्च जास्त असला तरी यात टोचाटोची व इतर गुंतागुंत नाही, त्यामुळे ते फायद्याचे आहे असे मधुमेही रुग्ण मार्क गिलीस यांनी सांगितले.