अमेरिकी शास्त्रज्ञांचा इशारा

आग्नेय आणि दक्षिण आशियामध्ये सध्या डेंग्यूची साथ जोरदार पसरली आहे. भारतालाही या रोगाचा फटका बसला आहे. मात्र पुढील वर्षी डेंग्यूची साथ मोठय़ा प्रमाणात पसरण्याची शक्यता आहे, असा इशारा अमेरिकी शास्त्रज्ञांनी दिला आहे. त्यामुळे डेंग्यूचा प्रश्न आणखी गंभीर होणार असून आतापासूनच उपाययोजना करणे गरजेचे आहे, असेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

डेंग्यूच्या साथीचा आणि तापमानवाढीचा संबंध असतो. तापमान वाढल्यास डेंग्यूची साथ मोठय़ा प्रमाणात पसरते. पुढील वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे तापमान वाढणार असून, त्यामुळे डेंग्यूची साथ पसरणार आहे, असे संशोधकांनी सांगितले.

‘‘गेल्या दोन दशकांपासून एल निनोचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात वाढ होत असून, हा धोका आपण लक्षात घेतला पाहिजे. पुढील वर्षी तापमानवाढीमुळे डेंग्यू विकाराचा प्रसार वेगाने होणार आहे. १९९७ व १९९८ मध्ये आग्नेय आशियातील आठ देशांमध्ये एल निनोमुळे डेंग्यूची साथ पसरली होती,’’ अशी माहिती फ्लोरिडा विद्यापीठाचे प्राध्यापक डेरेक कमिंग्ज यांनी दिली.

दरवर्षी हजारो लोकांना डेंग्यूची बाधा होते. मात्र त्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवणे या देशांना शक्य झालेले नाही. दरवर्षी डेंग्यूची साथ आग्नेय आशियात मोठय़ा प्रमाणात पसरते, हे चिंताजनक आहे. डेंग्यूमुळे आग्नेय आशियातील काही देशांमध्ये अनेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते आणि त्यामुळे या देशांमधील आरोग्य यंत्रणा बिघडते, असे कमिंग्ज यांनी सांगितले.

’  डास चावल्याने डेंग्यू होतो, पण उष्ण आणि उपोष्ण कटिबंधात

डेंग्यूचा प्रसार अधिक होतो.

’   दरवर्षी जगभरात ३९ कोटी जणांना डेंग्यूची बाधा होते.

’   डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी विशिष्ट औषधी उपचार पद्धती,

चिकित्सा यांचा अभाव आहे.