राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंधक आणि संशोधन संस्था (एनआयसीपीआर), नोयडा आणि आयुष मंत्रालयाची स्वायत्त संस्था ऑल इंडिया इस्टिटय़ूट ऑफ आयुर्वेदा यांच्यामध्ये कर्करोगाला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच त्यावर संशोधन करण्यासाठी करार करण्यात आला आहे.

एनआयसीपीआर आणि एआयआयए यांच्यामध्ये १९ ऑक्टोबर २०१६ ला सामंजस्य करारावर हस्ताक्षर करण्यात आले आहे. या कराराचा मुख्य उद्देश एनआयसीपीआर- नोयडामध्ये आयुष मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागांतर्गत ऑन्कॉलॉजी केंद्र स्थापन करण्याचा आहे. त्यामुळे कर्करोगाला प्रतिबंध, संशोधन आणि सेवा यासाठी मदत मिळणार आहे.

करारावर एआयआयएचे अभिमन्यू कुमार तसेच एनआयपीसीआरचे संचालक रवी मेहरोत्रा यांनी आयुष मंत्रालयाचे सचिव अजित एम शरण, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आरोग्य संशोधन विभागाचे सचिव डॉ. सौम्या स्वामीनाथन तसेच इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हस्ताक्षर करण्यात आले. या करारामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय कॅन्सर संस्थेसोबत द्विपक्षीय मदत करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या कराराचा मुख्य उद्देश कर्करोगाचे प्रमाण कमी करण्याचा आहे. या करारामुळे कर्करोगाचा प्रभाव कमी व्हावा यासाठी उपाययोजना करण्यात करण्यात येणार आहे. कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी केमोथेरपीचा वापर करण्यात येतो. मात्र त्याचे इतरही परिणाम होतात. त्यामुळे पारंपरिक औषधे निर्माण करण्यासाठी या कराराचा वापर करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)