बार्सिलोनामध्ये काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘मोबाइल वर्ल्ड काँग्रेस’मध्ये नोकियाने ‘३३१०’ पुन्हा आणण्याचा निर्णय जाहीर केला. जवळपास साडेतीन हजार रुपयांत हा मोबाइल नव्या रूपात, नव्या ढंगात पण जुनी ओळख घेऊन बाजारात दाखल होणार असल्याचे नोकियाने सांगितले. त्यानंतर अनेकांना हा फोन कधी येणार याची उत्सुकता आहे. सध्या टच स्क्रिन आणि स्मार्टफोनच्या जगात नोकिया कधीच मागे पडली, पण याही काळात आपण कीपॅडवरच चालणार आहे आणि त्याची मजबुती आधीसारखीच असणार असल्याचे नोकियाने सांगून ३३१०च्या रिलाँचची घोषणा केली. हा फोन एप्रिलमध्ये लाँच होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार येत्या शुक्रवारी म्हणजे २८ एप्रिलला जगभरात हा फोन लाँच होणार असल्याची माहिती सुत्रांंकडून समजत आहे. जर्मनी तसेच ऑस्ट्रेलियासारख्या देशात या फोनची प्रीबुकिंग देखील सुरूवात झाली. तर जूनमध्ये हा फोन भारतात लाँच होणार आहे.

सप्टेंबर २००० मध्ये हा फोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर जगभरात या फोनला तुफान प्रसिद्धी लाभली होती. ‘रफ अँड टफ युज’ आणि दीर्घ बॅटरी लाईफ या दोन कारणामुळे ग्राहकांच्या पसंतीस हा फोन उतरला होता. आता निळसर, लाल, पिवळा, राखाडी अशा रंगात हा फोन उपलब्ध होणार आहे. भारतीय बाजारपेठेत या फोनची किंमत ३ हजार ९०० रुपयांच्या आसपास असल्याचे बोलले जात आहे. येत्या २८ तारखेला हा फोन जगभरात लाँच होणार असला तरी भारतीयांना मात्र जून महिन्यापर्यंत या फोनसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

नोकिया ३३१०ची वैशिष्टय़े
* २.४ इंची आकाराचा रंगीत डिस्प्ले हा या फोनमध्ये केलेला सगळ्यात महत्त्वाचा बदल आहे. सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट पाहता येईल, अशी रचना यात केली आहे.
* ‘३३१०’मधला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे कॅमेरा. या फोनमध्ये दोन मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. सोबत एलईडी फ्लॅश देखील आहे, पण फ्रंट कॅमेरा मात्र यात नसणार.
* फक्त आणि फक्त नोकियामध्ये उपलब्ध असलेला स्नेक गेमही यात आहे. चार बटणांवर तो खेळता येणार आहे. ‘स्नेक’ गेम नव्या ‘३३१०’ मध्ये अधिक आकर्षक रूपात असणार आहे.
* दीर्घ बॅटरी लाईफ हा नोकियाचा यूएसपी आहे. या फोनची बॅटरी लाईफ २२ तासांपर्यंत आहे, तर ‘स्टॅण्डबाय’ स्वरूपात हा फोन महिनाभर चार्जिंगशिवाय ग्राहकांना वापरता येणार आहे.