एकेकाळी मोबाईल जगतात अधिराज्य गाजवणाऱ्या नोकिया कंपनीने काही महिन्यापूर्वीच दमदार पुनरागमन केलंय. या कंपनीनं आपला ‘३३१०’, ‘नोकिया ३’ आणि ‘नोकिया ५’ हे तीन फोन टप्प्याटप्प्यानं लाँच केले. हे फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेत. आता नोकियाचा बहुप्रतिक्षीत नोकिया ६ सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. हा फोन केवळ अॅमेझॉन या ई- कॉमर्स वेबसाईटवरून खरेदी करता येत आहे.

भारतीय नागरीकांना या नवीन मॉडेलला मोठ्या प्रमाणात पसंती देत आतापर्यंत तब्बल १० लाख जणांनी हा फोन ऑनलाईन बुक केला आहे. त्यामुळे अॅमेझॉनवर या फोनची विक्रमी नोंदणी झाली आहे. २३ ऑगस्टपासून हा फोन ग्राहकांना वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या वर्षाच्या सुरूवातीला झालेल्या मोबाईल वर्ल्ड काँग्रेसमध्ये नोकियाने पुनरागमनाची घोषणा केली होती. त्यानंतर पुढच्या तीन महिन्यात जगभरात या फोनचं लाँचिंग करण्यात आलं. पण भारतात मात्र मे ते जूनपर्यंत हा फोन लाँच होईल असं आधीच जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार नोकियाचा ३३१० हा फोन मे महिन्यात भारतात विक्रीसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर महिनाभराने म्हणजेच जून महिन्याच्या मध्यावर नोकियाचे अँड्राईड फोन लाँच करण्यात आले.

नोकियाने ‘नोकिया ६’ चीनमध्ये आधीच लाँच केला होता. तिथे या फोनला तुफान प्रसिद्धी लाभली होती. या फोनच्या किंमतीबाबत विविध तर्क मांडण्यात आले. या फोनची किंमत १८ हजारांच्या आसपास असल्याचे म्हटले जात होते. मात्र नोकिया ६ अवघ्या १४,९९९ रुपयांत उपलब्ध झाल्याने ग्राहकांनी या फोनच्या खरेदीवर अक्षरशः उड्या मारल्या. या फोनचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन १४ जुलैला सुरु झाले होते. अवघ्या २७ दिवसांत १० लाख लोकांनी या फोनला पसंती दिली आहे. हा फोन मॅट ब्लॅक आणि सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे. हा फोनला ५.५ इंचाच एचडी डिस्प्ले, गोरिला ग्लास प्रोटेक्शन, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी, १६ मेगापिक्सेल कॅमेरा, ८ मेगापिक्सेल फ्रँट कॅमेरा, फिंगरप्रिन्ट सेन्सॉर देण्यात आले आहे. त्यामुळे स्मार्टफोन वापरणाऱ्यांसाठी अनोखी वैशिष्ट्ये असलेल्या या फोनला ग्राहकांनी मोठी पसंती दिली.