या सोहळ्याचे प्रक्षेपण फेसबुक लाइव्ह आणि युट्युबवरुन होणार आहे. आपल्या नव्या उत्पादनांची जाहिरात करण्यासाठी मोबाइल वर्ल्ड काँग्रेस हा गेल्या काळातील सर्वात मोठा ‘प्लॅटफॉर्म’ समजला जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे लाँचिंग मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्येच केले आहे. सध्या नोकियाचे स्वामित्व असणारी एचएमडी कंपनी नोकियाच्या नव्या फोनची घोषणा येथेच करणार आहे. नव्या अॅंड्रॉइड फोनच्या घोषणेसह नोकिया त्यांचा एकेकाळी प्रसिद्ध असलेला ब्रॅंड ३३१० सुद्धा परत बाजारात आणण्याची घोषणा करणार आहे.  बार्सेलोना येथे होणाऱ्या या परिषदेला जगभरातून सर्व प्रसिद्ध ब्रॅंड येणार आहे. नोकिया त्यांच्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण फेसबुक आणि युट्युबवर दाखवणार आहे.  २६ फेब्रुवारीला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ९ वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार आहे.

आम्ही आमचे अॅंड्रॉइड फोन लाँच करणार आहोत असे नोकियाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.  याआधी नोकियाने फेसबुकवर विचारले होते की तुमचा आवडता नोकिया फोन कुठला आहे त्याला तुम्ही मतदान करा. नोकिया ३३१० विरुद्ध नोकिया ३६५० या दोन मोबाइलमध्ये चुरस होती. ग्राहकांनी हे दोन आपले सर्वात आवडते फोन आहेत असे सांगितले.  स्वस्त, टिकाऊ आणि दीर्घकालीन बॅटरी अशी वैशिष्ट्यै असणारा ३३१० हा फोन एकेवेळी खूप प्रसिद्ध होता. अॅंड्रॉइडचा जमाना आल्यानंतर हा फोन कालबाह्य झाला. त्यामुळेच नोकिया ३३१० हा फोन परत बाजारात येण्याची शक्यता आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार नोकिया ३३१० हा फोन भारतीय बाजारात मे २०१७ पर्यंत येणार आहे. रविवारी एचएमडी ग्लोबल नोकिया ६, नोकिया ५ आणि नोकिया ३ या फोनचे लाँचिंग होईल. नोकिया ६ हा फोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आला आहे. या कार्यक्रमात या फोनचे व्हेरियंट्स पाहायला मिळायला येणार आहेत.