सध्या सुट्ट्यांचा माहौल असून अनेकजण नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात गुंतले आहेत. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन संकेतस्थळांवर विविध वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. यामध्ये घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक गॅझेटस्, कपडे यांसारख्या गोष्टींना मोठ्याप्रमाणावर मागणी असली तरी आणखी एक गोष्ट ऑनलाईन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. इबे इंडिया आणि अॅमेझॉन या ऑनलाईन विक्रीस्थळांवर गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवऱ्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण भागात गायीचे शेण आणि पेंढ्यापासून या शेणींचा वापर चुलीत जाळण्यासाठी इंधन म्हणून करण्यात येतो. मात्र, शहरी भागातील लोकांनाही या गोवऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी इबे आणि ऑनलाईन यांसारख्या ऑनलाईन विक्रेत्यांनी ही सेवा सुरू केली आहे. काही विक्रेत्यांकडून गोवऱ्यांची मोठ्याप्रमाणावर खरेदी करणाऱ्यांना किंमतीत सूट देण्यात येत आहे. याशिवाय, काही ग्राहक या गोवऱ्या भेटवस्तू म्हणून देण्यासाठी वेष्टनात बांधून देण्याची मागणीही करत आहेत. साधारण ऑक्टोबर महिन्यापासून अॅमेझॉनवरून गोवऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीला सुरूवात झाली असून आत्तापर्यंत अनेकजणांनी आमच्याकडे गोवऱ्यांची ऑर्डर दिल्याची माहिती ‘अॅमेझॉन’च्या प्रवक्त्या माधवी कोचर यांनी दिली. शहरी भागात गोवऱ्या मिळणे कठीण असल्याने तेथील ग्राहकांकडून या गोवऱ्यांना सर्वाधिक मागणी असल्याचेही माधवी कोचर यांनी सांगितले. नुकत्यात होऊन गेलेल्या दिवाळीच्या दिवसांत धार्मिक विधींसाठी गोवऱ्यांची मोठ्याप्रमाणावर विक्री झाल्याचे ‘शॉपक्लुज’च्या राधिका अग्रवाल यांनी सांगितले. ‘शॉपक्लुज’च्या संकेतस्थळावर सध्या सर्व गोवऱ्यांची विक्री झाल्याचा संदेशही पाहायला मिळत आहे. किचन गार्डनिंगमध्ये सेंद्रीय खत म्हणूनही गोवऱ्यांचा वापर वाढत आहे. याशिवाय, गोवऱ्या जळतानाचा विशिष्ट वास अनेकजणांना जुन्या दिवसांची आठवण करून देणारा असल्याचेही राधिका अग्रवाल यांनी सांगितले. सध्या ऑनलाईन संकेतस्थळावर दोन आणि आठ गोवऱ्यांचे पॅकेट विक्रीला असून त्यांची किंमत १०० ते ४०० रूपये इतकी आहे.