अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना अन्नाची उपलब्धता कमी असल्याने त्यांचे कुपोषण होत असल्याची माहिती सामान्य आहे; पण एका नव्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, अल्प उत्पन्न गटातील किशोरवयीन मुलांमध्ये स्थूलपणाचा वाढता धोका आहे.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील संशोधक डेबोरा यंग यांनी केलेले संशोधन नुकतेच ‘पिडिअ‍ॅट्रिक ओबेसिटी’ नावाच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. त्यानुसार सामान्यपणे गरीब घरांतील मुलांना अन्नाची कमतरता जाणवल्याने त्यांचे योग्य पोषण होत नाही; पण किशोरवयीन मुले महाविद्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडतात आणि त्यांना अन्नाची उपलब्धता वाढते. त्यामुळे अधिक खाणे झाल्याने त्यांचाच स्थूलपणा वाढण्याची शक्यता असते. या प्रकारामागील संपूर्ण कार्यकारणभाव अद्याप समजू शकलेला नाही आणि यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अभ्यासामध्ये १८ वर्षांवरील २५ टक्के तरुण लठ्ठ होत असल्याचे दिसून आले.

संशोधकांनी विविध सामाजिक, वांशिक गट तसेच वय, लिंग आदी प्रकारांतील किशोरांवर प्रयोग करून पाहिले. त्यात १८ वर्षांवरील २२,८२३ मुलांवर २००८ नंतर सलग ४ वर्षे संशोधन करण्यात आले. त्यातून हे निष्कर्ष हाती आले. ते सध्या धक्कादायक वाटत असले तरी त्यावर अधिक संशोधनाची गरज असल्याचे यंग यांनी म्हटले.

संशोधनामध्ये या शास्त्रज्ञांनी २५ च्या खाली बॉडी-मास-इंडेक्स असलेल्या मुलांचा समावेश केला होता. त्यातही आशियाई मुलांसाठी तो आणखी कमी गृहीत धरावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)