जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांचा दावा
दैनंदिन जीवनात असंतुलित आहार पद्धतीचे दुष्परिणाम विविध संशोधनाद्वारे दिसून येत आहेत. अमेरिकेतील संशोधकांनी केलेल्या नव्या संशोधनातून स्निग्ध पदार्थाचे अतिसेवन मानवी मेंदूसाठी घातक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. स्निग्ध पदार्थाचे अतिसेवन मानसिक आरोग्यासाठी योग्य नाही, असे या शास्त्रज्ञांना या संशोधनातून सुचवायचे आहे.
स्निग्ध पदार्थाचा अतिरेक केवळ लठ्ठपणा वाढविण्यासाठी कारणीभूत नसतो, मेंदूला मानसिक आकलनाविषयक संवेदना करून देणाऱ्या रोगप्रतिकारक पेशीवर आघात करण्यास कारणीभूत ठरत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. शरीराशी निगडित हा बदल संतुलित आहार आणि असंतुलित आहारातून होणाऱ्या बदलाच्या सव्‍‌र्हेक्षणातून समोर आल्याचे मत जॉर्जिया विद्यापीठाचे अ‍ॅलेक्सिस एम. स्ट्रॅनाहान यांनी व्यक्त केले.
स्निग्ध पदार्थामुळे शरीरातील चरबीमध्ये वाढ होते. अतिरिक्त चरबीचा परिणाम स्वंयप्रतिकार करणाऱ्या मायक्रोजीला पेशीवर होतो. मायक्रोजीला पेशी मेंदूला संसर्ग करणाऱ्या घटकांपासून बचाव करताना शरीराची दैनंदिन प्रक्रिया सुरळीत ठेवण्याचे काम करते, पण जेव्हा शरीरातील लठ्ठपणा जसजसा वाढत जातो, त्याचा परिणाम मायक्रोलॉजीच्या पेशीमध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. यामुळे शरीराचा वाढणारा लठ्ठपणा या पेशीची मेंदूतील संक्रमण अवस्था बंद करते आणि त्यातूनच शरिरातील चेतासंधीवर आघात होऊन शरीराची अतिरिक्त वाढ होण्यास सुरुवात होते.
यावेळी संशोधनात दोन वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांमधील आहाराचे अवलोकन केले गेले. त्यापैकी संतुलित आहार घेणाऱ्या एका गटात शरीरातील साचलेल्या चरबीतून १० टक्के कॅलरी तयार होतात तर ६० टक्के कॅलरी नष्ट होतात. यासाठी संशोधकाकडून चार, आठ आणि बारा आठवडय़ांच्या संशोधनातून शरीरातील अतिरिक्त कॅलरीचे तीन पद्धतीने मूल्यमापन केले गेले. यात खाल्ल्यानंतरचे वजन, प्रथिनांची शरीरातील पातळी आणि गुल्कोजचे प्रमाण यांच्या निरीक्षणातून शरीरातील उच्च चरबीयुक्त असंतुलित आहार शरीराबरोबर मेंदूलाही घातक असल्याचे समोर आले आहे.