कोणताही सण जवळ आला की मुख्य आकर्षण असते ते खरेदीचे. महिला तर खरेदीमध्ये आघाडीवर असतात. सध्या ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला आहे. या सणासुदीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग कंपन्याही नवनव्या ऑफर्स लाँच करतात. यंदाही अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि मिंत्रा यांसारख्या साईटसनेही ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणल्या आहेत. असोचेमने नुकतेच खरेदीविषयक एक सर्वेक्षण केले. त्यामध्ये त्यांना काही आश्चर्यकारक निष्कर्ष आढळले. पाहूयात काय आहेत हे निष्कर्ष.

दिवाळीसारख्या मोठ्या सणांच्या काळात ऑनलाइन यूजर्स मोबाईल फोन, कपडे, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स अशा प्रकारच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. इंटरनेटचा वाढत असलेला प्रसार आणि त्यामुळे सोपी झालेली खरेदी ऑनलाईन खरेदीची मुख्य कारणे असल्याचे असोचेमकडून सांगण्यात आले आहे. सध्या लहान गावांमध्येही इंटरनेट सहज उपलब्ध होत असल्याने ऑनलाइन शॉपिंगमध्ये मोठी वाढ झाली आहे. याशिवाय नोकरीवर सुटी नसणे, दुकानात असणारी गर्दी यांमुळेही अनेक जण ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देताना दिसतात.

मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, बेंगलुरु, चंडीगड आणि डेहराडून या महत्त्वाच्या १० शहरांमध्ये संस्थेने हे सर्वेक्षण केले. यातही खरेदी करण्यात दिल्ली, मुंबई आणि बंगरूळ ही शहरे पुढे असल्याचे सर्वेक्षणातून समोर आल्याचे दिसते. पुरुषांमध्ये ऑनलाईन खरेदीचे प्रमाण जास्त असून ते ६५ टक्के इतके आहे. तर ३५ टक्के महिला ऑनलाईन खरेदी करतात. विशेष म्हणजे २५ ते ३४ वयोगटातील तरुणांमध्ये ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण जास्त असल्याचेही या सर्वेक्षणात सांगण्यात आले आहे.