डोके अथवा अंग दुखायला लागल्यानंतर आपण वेदनाशामक (पेन किलर) गोळी घेऊन ताप्तुरता उपाय करण्याचा प्रयत्न करतो. त्या वेळी साधारणपणे आयब्युप्रोफेन आणि डायक्लोफेनॅक या गोळय़ांची चिठ्ठी डॉक्टरांकडून देण्यात येते. मात्र या वेदनाशामक गोळय़ा घेत असाल तर सावधान! या गोळय़ा फक्त एक आठवडाभर घेतल्या तर यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ५० टक्क्यांनी बळावत असल्याचा इशारा एका नव्या अभ्यासात देण्यात आला आहे. बीएमजी नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनानुसार, स्टिरॉइड नसलेले आणि दाहविरोधी औषधे वेदनेवर उपचार आणि दाह कमी करण्यासाठी वापरली जातात. फक्त एक आठवडा जरी ही औषधे वापरली तरी यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अतिप्रमाणात या औषधांचा डोस घेणे शरीरासाठी अतिशय हानिकारक असल्याचे, या अभ्यासात म्हटले आहे.

मागील अभ्यासामध्ये वेदनाशामक गोळय़ांमुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढत असल्याचे स्पष्ट झाले होते. सध्या करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये हृदयविकाराचा झटका, तो किती वेळामध्ये येऊ शकतो, तसेच त्याचे प्रमाण किती टक्क्यांनी वाढू शकते, याचा अभ्यास करण्यात आला.

या संशोधनासाठी ४ लाख ४६ हजार ७६३ लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामधील ६१ हजार ४६० लोकांना हृदयविकाराचा झटका आला होता. वेदनाशामक गोळय़ा घेतल्याने हृदयविकारचा झटका येण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढत असल्याचा इशारा संशोधकांनी या अभ्यासामध्ये दिला आहे.