मुसळधार पाऊस…वाफाळता चहा आणि त्यासोबत चविष्ट आणि खमंग भजी…वाह क्या बात है!…खवय्यांना हाच अनुभव मिळणार आहे मायानगरी मुंबईत. त्यात मुंबईतील दादर म्हणजे खाण्याची आणि खवय्यांची चंगळच. याच दादरमध्ये अनेक महोत्सव भरवले जातात. पण यावेळी जरा हटके महोत्सव भरवण्यात येणार आहे. भजी महोत्सव. २४ जूनपासून हा भजी महोत्सव भरवला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी ५ वाजता महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. रात्री नऊ वाजेपर्यंत हा महोत्सव असेल.

यात वेगवेगळ्या प्रकारचे भज्यांचे जवळपास २५ प्रकार चाखता येणार आहेत. नुकताच पाऊस सुरु झाला असून मुंबईकरांना शाकाहारी आणि मांसाहारी भज्यांचा आस्वाद घेता येणार आहे. दादर सांस्कृतिक मंचातर्फे आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव दादरच्या कॅडल रोडवरील अॅन्टोनिया डिसिल्व्हा टेक्निकल हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. पाऊस, भजी आणि चहाचा आस्वाद घेत खवय्यांसाठी गाण्याच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्या ज्येष्ठ व्यक्ती किंवा इतरांना भज्यांचा आस्वाद घेण्यासाठी दूर जाणे शक्य नाही त्यांना याठिकाणी हा आनंद घेता येणार आहे.