स्वछायाचित्र म्हणजे सेल्फीचा सध्या जमाना आहे. मोबाईलच्या मदतीने स्वत:चे स्वत: काढलेले छायाचित्र असा त्याचा अर्थ. या सेल्फीच्या नादात अनेक जणांनी प्राण गमावल्याने छायाचित्राचा हा प्रकार जेवढा आनंददायी स्मृतींना बद्ध करणारा तेवढाच वेदनदायीही. सेल्फीच्या मदतीने स्वादुपिंडाचा कर्करोग किंवा इतर रोगांचे निदान करता येते, असा दावा करण्यात आला असून त्यासाठी एक अ‍ॅपही त्यावर करण्यात आले आहे.

स्वादुपिंडाचा कर्करोग व काविळीत त्वचेचा रंग पिवळा होणे, डोळे पिवळे पडणे ही प्रमुख लक्षणे असतात. ती रक्तातील बिलीरूबीनमुळे दिसतात. नुसत्या डोळयांना त्वचेचा रंग पिवळा झालेला आधीच्या टप्प्यात कळत नाही, पण या अ‍ॅपमुळे स्वछायाचित्रावरून कावीळ ओळखता येते. बिलीरूबीनची पातळी थोडी वाढलेली असतानाच हे शक्य होते. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी बिलीस्क्रीन अ‍ॅप तयार केले असून त्यात स्मार्टफोन कॅमेरा, संगणक दृष्टी अलगॉरिथम, मशीन लर्निग साधने यांचा समावेश आहे.

डोळ्याचा जो पांढरा भाग असतो त्याला स्क्लेरा असे म्हणतात, तो भाग काविळीत पिवळा पडतो. स्वछायाचित्रात ते पटकन  कळते. संगणकीय साधनांच्या मदतीने या पांढऱ्या भागावरचा परिणाम जास्त ठळकपणे दिसतो. तरंगलांबीच्या मदतीने डोळ्याच्या रंगाची माहिती बारकाईने तपासली जाते व त्याचा संबंध बिलीरूबिनच्या प्रमाणाशी जोडता येतो. स्वादुपिंडाचा कर्करोगही भयानक असतो, त्यात लवकर निदान होत नाही. तो लवकर कळला तर शस्त्रक्रिया करता येते असे वॉशिंग्टन विद्यापीठाचे प्राध्यापक जिम टेलर यांनी सांगितले. या कर्करोगातही रक्ताच्या चाचणीच्या तुलनेत ८९.७ टक्के रूग्णात स्वछायाचित्राने अचूक निदान करता आल्याचा दावा केला आहे.