शरीर कंप होण्याच्या (पार्किन्सन्स) आजारावर संशोधकांनी आनुवंशिक ‘स्विच’ शोधला असून, शरीर कंप होण्याचा आजार दूर होण्यासाठी याचा वापर होणार आहे.

अमेरिकेतील लिसेस्टर विद्यापीठाच्या संशोधकांनी याबाबत संशोधन केले असून, पार्किन्सन्स आजारामध्ये ‘एटीएफ४’ जनुक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसून आले. शरीरातील न्यूरॉनच्या आरोग्यासाठी तंतुकणिका चयापचयावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे जनुक मदत करत असते.

ज्या वेळी माश्यांमधील एटीएफ४ जनुक कमी केले जाते, त्या वेळी यातील तंतुकणिका चयापचयावर परिणाम होत असल्याचे दिसून आले. यामुळे हालचाल करण्यात नाटय़मय पद्धतीने दोष निर्माण होणे, वयोमान कमी होणे यासह मेंदूमधील तंतुकणिका अकार्यक्षम होत असल्याचे लिसेस्टर विद्यापीठातील मिगुएल मार्टिन्स या संशोधकाने म्हटले आहे.

संशोधकांनी या प्रक्रियेतील जनुक जाळे शोधत न्यूरॉनचे नुकसान टाळण्यासाठी नवीन उपचारपद्धत शोधून काढली आहे.

विशेष बाब म्हणजे पार्किन्सन्स आजारात तंतुकणिकांना पुनस्र्थापित करण्यात येते. यामुळे न्यूरॉनचे होणारे नुकसान टाळले जाते, असे मार्टिन्स यांनी सांगितले.

जनुक ‘पीआयएनके१’  आणि ‘पार्किन’ मध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन) झाल्यामुळेही पार्किन्सन्स आजार होत असल्याचे संशोधकांना दिसून आले. एटीएफ४ जनुक पार्किन्सन्स आजारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे संशोधकांनी या वेळी सांगितले.

जगातील जवळपास ६० लाखांपेक्षा अधिक लोकांमध्ये पार्किन्सन्सची लक्षणे आढळून येतात. याची सुरुवात अतिशय हळूहळू दिसून येते, असे संशोधकांनी सांगितले. हे संशोधन ‘सेल डेथ अ‍ॅण्ड डिफरन्सिएशन’ नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.