पाळीव प्राण्यांवर खर्च करणे ही भारतात अशक्यप्राय वाटणारी मानसिकता आता इतकी रुळली आहे, की महिन्याला हजारो रुपये प्राणिपालक पेटवर खर्च करतात. कुत्री, मांजरे पाळण्यातील ‘प्रतिष्ठे’चा मुद्दा गौण होत सोबती मिळणे ही गरज होत चालली आहे. त्यामुळे शौकीन प्राणिपालकांनी आता आपली प्रतिष्ठा परदेशी प्राण्यांच्या (एक्झॉटिक) पालकत्वाकडे वळवली आहे. कुत्री, मांजरे, मासे यांच्या पुढे जाऊन दिमाखदार दिसणारे परदेशी पक्षी, इंग्रजी चित्रपटांमध्ये अ‍ॅनिमेशनतंत्राच्या माध्यमातून धमाल घडवून आणणारे हॅमस्टर्स, फेरेट्स यांच्यासारखे छोटे प्राणी याच्या पुढचा टप्पा आता भारतीय प्राणी शौकीन गाठत आहे. या घडीला महागडे परदेशी प्राणी पाळण्याचे प्रमाण अगदी मोजकेच असले, तरी ते येत्या काळात त्याचे लोण पसरण्याची नांदी एखाद्या पशू उत्पादनांच्या दुकानात चक्कर मारली तरी दिसून येते. इंटरनेटवर उघडपणे परदेशी प्राण्यांचा बाजार सुरू आहे.

कुत्री, मांजराचे खाणे, खेळणी, कपडे, पलंग, खोल्या यांपासून ते अगदी डिओ, हेअर कलर अशा सगळ्या उत्पादनांनंतर थोडय़ाशा संपृक्त अवस्थेकडे पाळीव प्राण्यांच्या दुकानांची वाटचाल सुरू झाली. आता नव्याने कासव, इग्वाना यांचे खाणे, वस्तूही दुकानांमध्ये दिसू लागल्या आहेत. जे प्राणी वन्यजीव कायद्यामध्ये येतात ते आपल्याकडे पाळता येत नाहीत. मात्र परवानगी घेऊन परदेशी प्राणी पाळण्याची मुभा शौकिनांना मिळते. परदेशात प्रजोत्पादन झालेल्या या प्राण्यांच्या अनेक पिढय़ा भारतातही नांदत आहेत. किंमत, सुविधेची कमतरता यांमुळे अद्याप गल्लोगल्ली यांची विक्री सुरू झालेली नाही. तरीही अधून मधून छोटय़ा जाहिरातींच्या संकेतस्थळांवर हे प्राणी दत्तक देण्याच्या जाहिराती डोकावू लागल्या आहेत. इग्वाना, लाल पट्टा असणारी पाणकासवे, समुद्रातील मासे यांच्या किमती अगदी ३ ते ५ लाख रुपयांपर्यंतही आहेत. त्याशिवाय परदेशातील संस्थेकडून कागदपत्रांची पूर्तता करून खरेदी करणे, हे प्राणी भारतात आणणे, त्यांचे खाणे, उपचार आवश्यक असे पिंजरे हा सगळा खर्चिक मामला भारतीय शौकीनही सांभाळून आहेत. अर्थातच त्याचे प्रमाण मात्र खूप कमी आहे.

इग्वाना – इग्वाना हा सरडय़ाचा भाऊबंध. यातील अमेरिकन इग्वाना किंवा ग्रीन इग्वाना हा चार ते साडेचार फुटांपर्यंत वाढणारा सरडा भारतात अनेक चित्रपटांमधून प्रसिद्ध झाला. ‘कबिल’ या चित्रपटांनंतर रजनीकांतचे या इग्वानाबरोबर फोटो झळकू लागले आणि त्याचे आकर्षण भारतात वाढले. फाइंडिंग मेमो या माशांवरील चित्रपटाने समुद्री मासे खरेदीची उत्सुकता भारतात चाळवली. त्यासाठीचे विशिष्ट तापमान, क्षारता याचे गणित करून मोठे मोठे फिश टँकची खरेदी वाढत गेली. काही वर्षांपूर्वी फेंगशुईचे प्रस्थ भारतात वाढले. घरातील धन वाढवण्यासाठी कासवावर खर्च करण्याची सुरुवात मोठय़ा प्रमाणावर झाली. मानेवर लाल पट्टा असणाऱ्या कासवाला मागणी वाढली. या सगळ्या परदेशी पाहुण्यांमध्ये हे कासव तुलनेने कमी किमतीत मिळणारा प्राणी. या सगळ्यात महागडा, सर्वाधिक क्लिष्ट प्रक्रिया असलेला प्राणी म्हणजे ‘पॉकेट मंकी’ म्हणजे हाताच्या बोटाला धरून बसू शकेल असे छोटेसे माकड. गेल्या काही वर्षांत भारतातील परदेशी प्राण्यांचे प्रजोत्पादन करणाऱ्या संस्थांनी हे माकडी विक्रीला सुरुवात केली आहे. प्राण्यांची आयात निर्यात करण्यासाठी बंदी असली, तरी त्यापूर्वीच भारतीय बाजारपेठेत बस्तान बसवलेल्या प्राण्यांची खरेदी-विक्री खुलेपणाने तर कधी छुपेपणाने होते आहे.