परदेशी प्रजातींचे महागडे श्वान, मांजरे, पक्षी भारतीय मध्यमवर्गीय म्हणवल्या जाणाऱ्या घरात विसावू लागले. प्राणी पालकत्वाची हौस जेवढी फोफावली तशीच हळूहळू खर्चिकही झाली. प्राणी खरेदी करण्यापासून वेळप्रसंगी त्याच्या उपचारापर्यंतचा सगळाच मामला लाखोंच्या घरात जाऊन पोहोचला. हजारो, वेळप्रसंगी लाखो रुपये खर्चून घरी आणलेल्या प्राण्याची बडदास्त ही प्रेमापोटी ठेवण्यात येत असली तरी मुळातच पूर्णपणे पालकाच्या हाती नसलेल्या अनेक संकटांना तोंड देताना केलेल्या खर्चाचा व्यवहारही समोर येऊ लागला. या सगळ्यातून पाळीव प्राण्यांच्या विम्याची मागणी गेल्या काही वर्षांत वाढू लागली आहे.

जिंदगी के साथ भी, बाद भी.. म्हणत माणसाचा आयुर्विमा आणि आरोग्य विमा काढण्यासाठीची एक मोहीम काही वर्षांपूर्वी भारतात जोमात होती. कालांतराने या मोहिमेचे रंगढंग बदलत गेले. माणसाबरोबरच खर्चिक वस्तूंचा विम्याची संकल्पना रुजली. चोरी झाली, काही आपत्ती आली, तर झालेल्या नुकसानाचा काही अंश तरी भरून निघावा, हा त्यामागील उद्देश. अचानक आरोग्य समस्या उभी राहिली तर त्याचा भरमसाठ खर्च पेलता यावा हा आरोग्य विम्यामागील उद्देश. प्राण्यांचा विमा काढताना या दोन्हीचे मिश्रण दिसून येते. गोठय़ातील गुरे ही उपजीविकेचे साधन असणाऱ्यांसाठी प्राण्यांचा विमा अशी मूलभूत कल्पना भारतात होती. गुरे हरवली, दगावली, आजारी पडली तर हा विमा शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत होता. शर्यतीत पळणाऱ्या लाखोंची बोली लागणाऱ्या घोडय़ांचाही विमा पूर्वीपासून काढण्यात येतो. मात्र घरी पाळलेल्या कुत्रा, मांजराचा विमा काढण्यासाठी पालकांकडूनही प्राधान्य दिले जात नव्हते. या हौशीमागची आर्थिक गुंतवणूक वाढली आणि घरातील प्राण्यांच्या विम्याची आवश्यकता समोर आली. प्राण्यांवरील सर्व प्रकारचे अद्ययावत उपचार आता भारतात उपलब्ध आहेत. मात्र ते काही अंशी खर्चिकही आहेत. अशावेळी हा प्राण्यांसाठीचा विमा पालकांना मदत करतो.

आकर्षक योजनांची स्पर्धा

प्राण्यांच्या विम्याबाबतही आता कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. साधारणपणे प्राण्याचा अपघाती मृत्यू, विषप्रयोगामुळे झालेला मृत्यू, अल्पकाळात नैसर्गिक मृत्यू, हरवणे, डॉग शोमध्ये काही कारणाने जाऊ न शकल्यास त्याचे नुकसान यासाठी विम्याची सुरक्षा मिळते. मात्र आता अनेक कंपन्यांनी उपचार आणि इतर बाबींचाही समावेश केला आहे. वाढत्या श्वानप्रेमाला आपल्या कह्य़ात घेण्यासाठी विमाकंपन्या सरसावल्या आहेत. त्यातून आकर्षक योजनाही पालकांना मिळतात. भारतात मांजरांचा विमा काढण्याकडे अजिबातच कल नाही. मात्र काही परदेशी कंपन्या ही सुरक्षादेखील पुरवतात. मात्र सध्या भारतीय बाजारपेठेत मांजराच्या पालनापेक्षा त्याचा विमाच काही प्रमाणात अधिक खर्चिक ठरतो.

अडचणींचाही डोंगर

बहुतेक विमा कंपन्या या रेबिज, विषाणूजन्य आजारांसाठी सवलत देत नाहीत. त्याचप्रमाणे ब्रिडिंगबाबतही कंपन्या सवलत देत नाहीत. मात्र यापेक्षाही पालकांसमोरील सर्वात मोठी अडचण सध्या आहे ती म्हणजे विम्याची क्लिष्ट प्रक्रिया. श्वानाचा विमा काढण्यासाठी मुळात त्याची नोंदणी आवश्यक असते. त्याचबरोबर पशूवैद्याचे प्रमाणपत्र लागते. ज्या श्वानाचा विमा काढायचा त्याच्या नाकाची प्रतिमा (नोझ प्रिंट) घेतली जाते, किंवा त्यावर शिक्का मारला जातो. असे असले तरीही प्रत्यक्षात विम्याचा लाभ मिळण्यासाठी प्राण्याची ओळख पटवण्याची अडचण अनेकदा येते. प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्याचे शवविच्छेदन करून त्याचा अहवालही अनेक कंपन्या मागतात. प्रत्येक वेळी प्राणी पालकांना ते शक्यही नसते. त्कंपन्यांकडून मात्र ८० टक्के दावे निकालात काढल्याचे सांगण्यात येते.

भारतातील आणि भारतात शिरकाव केलेल्या परदेशी कंपन्यांची श्वानविम्याची ही बाजारपेठ अद्याप लहान स्वरूपात आहे. त्यासाठीचे अनेक आडाखेही परदेशात असलेल्या वातावरणासाठी अनुकूल असल्याचे दिसते. मात्र आता हळूहळू वाढती मागणी आणि प्रतिसाद यांतून प्राणी विम्याच्या मोठय़ा उलाढालीचे संकेत भारतीय बाजारपेठही देते आहे.