जे लोक शारीरिकदृष्टय़ा नियमितपणे कार्यप्रवण असतात त्यांच्यात मानसिक सौख्य जास्त असते, किंबहुना ते वाढते असे एका संशोधनात दिसून आले. स्मार्टफोनच्या आधारे १० हजार व्यक्तींची माहिती घेऊन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ब्रिटनमधील केम्ब्रिज विद्यापीठ व इसेक्स विद्यापीठ यांच्या संशोधकांनी स्मार्टफोनच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात माहिती गोळा केली. त्यात रोजच्या जीवनात शारीरिक पातळीवर सक्रिय राहणाऱ्या लोकांचे मानसिक आरोग्य चांगले राहते व त्यांच्या वर्तनातही सुसंगती असते असे दिसून आले. स्मार्टफोनच्या मदतीने मुडट्रॅकिंग अ‍ॅपचा वापर करून असा निष्कर्ष काढण्यात आला, की जे लोक सतत सक्रिय असतात किंवा व्यायाम करतात त्यांचे भावनिक आरोग्य चांगले असते. व्यायाम, शारीरिक सक्रियता यांचा मानवी सौख्याशी काय संबंध असतो याचे संशोधन यापूर्वीही झाले आहे. त्यात असे दिसून आले आहे, की जास्त व्यायाम केल्याने मानसिक आरोग्य सुधारते, पण इतर संशोधनात त्याचा परस्परसंबंध नसल्याचेही म्हटले आहे. यातील बहुतेक संशोधन हे आधीच्या स्वअहवालांवर आधारित होते व एकदाच ती माहिती जमवलेली होती. आताच्या संशोधनात स्मार्टफोनच्या मदतीने नव्याने माहिती घेतली आहे. सहभागी व्यक्तींना काही प्रश्नही यात विचारण्यात आले होते. किती उत्साहीपणा किंवा झोपाळूपणा वाटतो, सकारात्मक व नकारात्मक विचार किती येतात, असे प्रश्न यात विचारण्यात आले होते. केम्ब्रिज विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे जॅसन रेन्टफ्रो यांनी सांगितले, की शारीरिक सक्रिय लोक हे जास्त सुखी व सकारात्मक असतात. प्लॉस वन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)