अमेरिकेच्या आरोग्यतज्ज्ञांचे महत्त्वपूर्ण संशोधन
सकारात्मक विचारांचे फायदे आयुष्यात सर्वच क्षेत्रांत मिळतात. सकारात्मक विचार असलेली व्यक्ती कोणत्याही परिस्थितीतून सहज मार्ग काढू शकते. आता त्याचे फायदे हृदयविकारातही होत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अमेरिकेतील पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील आरोग्यविज्ञान शाखेतील संशोधक नॅन्सी सीन आणि त्यांच्या गटाने हृदयविकाराने ग्रस्त असलेल्या १००० रुग्णांवर याबाबत संशोधन केले. ते पाच वर्षे चालले होते. सायकोसोमॅटिक मेडिसिन नावाच्या वैज्ञानिक नियतकालिकात यासंबंधीचे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. त्यानुसार ज्या रुग्णांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन होता, त्यांचे आयुष्य अधिक उत्साही आणि आरोग्यदायी असल्याचे दिसून आले. असे रुग्ण शारीरिकदृष्टय़ा अधिक कार्यक्षम होते. तसेच ते वेळेवर औषधे घेत होते. त्यांना झोप चांगली लागत होती आणि ते धूम्रपान करण्याची कमी शक्यता होती. त्यांच्यापेक्षा तुलनेने कमी सकारात्मक असलेल्या रुग्णांमध्ये या बाबीही कमी प्रमाणात दिसून येत होत्या.
नकारात्मक भावना शरीरावर विपरीत परिणाम करतात हे माहीत आहे. पण सकारात्मक भावना शरीरावर आरोग्याच्या दृष्टीने नेमक्या कशा प्रकारे परिणाम करतात यावर फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यासाठी अधिक संशोधन करणे गरजेचे आहे, असे नॅन्सी यांनी सांगितले. तसेच सकारात्मक भावना अनेक दीर्घ मुदतीच्या आरोग्यविषयक सवयींवर अवलंबून असतात. त्या रोग निर्माण करण्याची शक्यता कमी करण्यास उपयोगी ठरतात, असेही त्यांनी सांगितले.
या संशोधनात सहभागी व्यक्तींची वेगवेगळ्या दहा निकषांवर आधारित पाहणी करण्यात आली. त्यात झोपेचा दर्जा, शारीरिक श्रम, वेळेवर औषधे घेणे, मद्य किंवा सिगारेटपासून दूर राहणे अशा गोष्टींचा समावेश होता. तसेच रुग्णांची सामाजिक, आर्थिक, भौगोलिक पाश्र्वभूमी, त्यांच्यातील नैराश्याचे प्रमाण, हृदयरोगाची तीव्रता आदी घटकही विचारात घेतले होते. यातून असे लक्षात आले की, ज्या रुग्णांचे विचार अधिक सकारात्मक होते, त्यांचे वर्तन चांगले होते आणि ते अधिक आरोग्यदायी होते. रुग्णांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन कसा कायम ठेवायचा यावर अधिक संशोधन झाल्यास ते फायद्याचे ठरेल, असे या शास्त्रज्ञांनी सांगितले.