सोरायसिस या त्वचारोगाचा हृदयविकाराशी संबंध असल्याचा दावा अमेरिकेतील आरोग्यतज्ज्ञांनी केला आहे. सोरायसिस या विकारावर लवकरात लवकर उपचार घेणे आवश्यक आहे, नाही तर त्यामुळे हृदयविकार किंवा पक्षघाताचा झटका येऊ शकतो, असे या आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले.

अमेरिकेतील भारतीय वंशाच्या आरोग्यतज्ज्ञांनी सोरायसिस या विकारावर संशोधन केले असून, त्याद्वारे त्यांनी हा दावा केला आहे. सोरायसिस या विकारात रक्तवाहिन्यांमध्ये जखमा निर्माण होतात, त्यामुळे रुग्णाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे या आरोग्यतज्ज्ञाने सांगितले. डॉ. नेहाल एन. मेहता असे या आरोग्यतज्ज्ञाचे नाव असून, ते बेथेस्डा येथील ‘नॅशनल हार्ट, लंग अ‍ॅण्ड ब्लड इन्स्टिटय़ूट’मध्ये कार्यरत आहेत.
मेहता आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने सरासरी ४७ वय असलेल्या ६० रुग्णांवर संशोधन केले, ज्यांना सोरायसिस हा विकार झाला होता. त्याची तपासणी केल्यानंतर काही जणांना हृदयविकार झाल्याचेही समोर आले.
सोरायसिस या विकारात त्वचेतील पेशींची वाढ जलदगतीने होते, त्यामुळे त्वचा जाड होणे, लाल किंवा पांढरे चट्टे निर्माण होणे असे प्रकार या विकारात दिसतात. परंतु डॉ. मेहता यांचे म्हणणे आहे की, सोरायसिसचे प्रमाण अधिक असेल तर रक्तवाहिन्यांमध्ये जखमा निर्माण होतात, त्याचा परिणाम हृदयावर होतो, प्रसंगी रुग्णालय हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते.
रुग्णांच्या रक्तवाहिन्यांची न्यूक्लिअर स्कॅनद्वारे पाहणी करण्यात आली, त्या वेळी बहुतेक रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जखमी आढळल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

सोरायसिस आणि हृदयविकार यांचा संबंध आहे. सोरायसिसमुळे रुग्णांच्या रक्तवाहिन्यांमध्ये जखमा निर्माण होतात. रुग्णाच्या बाह्यांगावर जेवढे सोरायसिसचे चट्टे अधिक असतात, तेवढय़ा रक्तवाहिन्यांमधील जखमा अधिक.
– डॉ. नेहाल एन. मेहता