देशात २००५ ते २०१५ या वर्षांत पाच वर्षांखालील दहा लाख बालकांचा जीव वाचविण्यात आला आहेत. न्यूमोनिया, अतिसार, धनुर्वात, गोवर या आजारांमुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या दरात लक्षणीय घट झाली असल्याचा अभ्यास लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. २००० आणि २०१५ मध्ये पाच वर्षांखालील २.९ कोटी बालकांचे विविध आजारांमुळे मृत्यू झाली असल्याची माहिती सयुक्त राष्ट्रांकडून देण्यात आली. २००५ पासून बालमृत्यू दरात कमी करण्यात भारताला यश आले असून जर २०००-२००५ दरम्यानच्या मृत्युदरात बदल झाला नसता तर २०१५ पर्यंत ३ कोटी बालकांचा मृत्यू झाला असता असे सेंट मायकल्स रुग्णालयाच्या ग्लोबल हेल्थ रिसर्च केंद्राचे प्रमुख डॉ. प्रभात झा यांनी सांगितले. अकाली बालमृत्यूबाबत जगातील पातळीवर करण्यात आलेला हा सर्वात मोठा अभ्यास आहे. यासाठी आजारपणात आपले मूल गमावलेल्या एक लाख पालकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या अभ्यासात नवजात (एक महिन्यापेक्षा कमी वय असलेल्या) बालकांच्या मृत्युदरात प्रति वर्षी ३.३ टक्क्यांनी घट झाल्याचे म्हटले असून एक महिना ते ५९ महिने वयाच्या बालकांच्या मृत्यूत ५.४ टक्क्यांनी घट झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी दिलेले बालमृत्यू दरात घट करण्याचे जागतिक ध्येय गाठण्यासाठी भारताने १ ते ५९ महिन्याच्या वयोगटातील बालकांच्या मृत्युदरात होणारी घसरण राखण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे नवजात बालकांच्या मृत्युदरात प्रति वर्षी पाच टक्क्यांनी घट करण्याची गरज आहे.