रिलायन्सच्या बहुचर्चित जीओ फोनची प्री-बुकिंग आजपासून सुरु होत आहे. कंपनीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून फोनच्या बुकिंगला सुरुवात होणार आहे. प्री-बुकिंगसाठी सुरुवातीला ५०० रुपये भरावे लागतील. कंपनीच्या वेबसाईटसह माय जिओ अॅप आणि रिलायन्स डिजिटलच्या स्टोअर्समध्ये प्री-बुकींग करता येणार आहे.

जिओ फोनची किंमत ‘शून्य’ 

या फोनसाठी दीड हजार रुपये डिपॉझिट घेण्यात येणार आहे. प्री-बुकिंगसाठी ५०० रुपये दिल्यानंतर उर्वरित हजार रुपये फोन डिलिव्हरीच्या वेळेस द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, हा फोन यूजर्सने तीन वर्षे म्हणजेच ३६ महिने वापरल्यास ते दीड हजार रुपये त्याला परत देण्यात येतील. याचाच अर्थ हा फोन ग्राहकाला फुकटच मिळणार आहे.

जिओ फोनची वैशिष्ट्ये:

– जिओचा हा फोन ४ जी आहे.

– हा ‘भारतात, भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेला फोन आहे’ असा कंपनीचा दावा आहे.

– जिओ फोनवरून ग्राहकांना १५३ रुपयांमध्ये महिनाभर ‘अनलिमिटेड डेटा’ वापरता येईल.

– आठवड्याला ५३ रुपये आणि २ दिवसांसाठी २३ रुपयांत ‘अनलिमिटेड डेटा’ असे मिनी प्लॅन्सही कंपनीने ग्राहकांना दिले आहेत.

– सर्व व्हॉइस कॉल मोफत असतील.

हा फोन ऑनलाइन आणि ऑफलाइनही बुक करता येणार आहे. जिओच्या रिटेलर्स आणि रिलायन्स डिजिटलच्या स्टोअर्समध्ये ऑफलाइन बुकिंग करता येईल. तर माय जिओ अॅप आणि जिओ डॉट कॉमवरून ऑनलाइन बुक करता येईल.

जीओ सिमकार्डने टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातल्यानंतर आता रिलायन्स जीओचा हा ‘स्वस्त आणि मस्त’ फोन बाजारात आला आहे. या माध्यमातून देशभरातील ५० कोटी मोबाईल फोन यूजर्सपर्यंत पोहोचण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. आठवड्याला ५० लाख फोन विकण्याचे लक्ष्य कंपनीने निश्चित केले आहे.