रिलायन्स जिओने जेव्हापासून बाजारात प्रवेश केला आहे, तेव्हापासून इतर टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. जिओकडे ग्राहक आकर्षित होत असल्याने इतर नामांकित कंपन्यांनीही आपल्या दरांमध्ये बदल केले आहेत. मोफत इंटरनेट आणि मोफत कॉलिंगची सुविधा देत जिओने एकप्रकारे मोबाईल क्षेत्रात मोठी क्रांतीच केली आहे. यासाठी जिओने प्रीपेड ग्राहकांसाठी अनेक प्लॅनही लाँच केले. मात्र काही यूजर्ससाठी जिओ आपली ही सुविधा बंदही करु शकते. आता असे कोण यूजर्स आहेत ज्यांना कंपनीच्या या सुविधांचा लाभ घेता येणार नाही. तर ज्या व्यक्ती आपल्या व्यवसायासाठी जिओ कार्डचा वापर करत असतील त्यांचे कनेक्शन कंपनी बंद करु शकते.

अनेक व्यवसायांमध्ये कॉलिंगसाठी जिओसारख्या कार्डसचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे कंपनीला तोटा होण्याची शक्यता असल्याने कंपनीने नुकतीच याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रिलायन्स जिओने दिलेल्या माहितीनुसार, रोज ३०० मिनिटांहून जास्त किंवा आठवड्याला १२०० मिनिटांहून जास्त कॉल झाल्यास ते विशिष्ट कार्ड व्यावसायिक गरजेसाठी वापरले जात आहे असे कंपनी समजेल. तसेच महिन्याला ३००० मिनिटांहून अधिक कॉल करणाऱ्यांसाठीही हे लागू आहे. आपण लाँच केलेला प्लॅन हा केवळ वैयक्तिक वापरासाठी आहे.

कोणी जर या सुविधेचा चुकीचा वापर करत असेल तर त्यांची कॉलिंग सुविधा बंद करण्याचे सगळे अधिकार रिलायन्सकडे आहेत असेही रिलायन्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कोणाकडून जिओ कार्डचा व्यावसायिक वापर होतो आणि कोणाकडून वैयक्तिक हे तपासण्याचे तंत्रज्ञान कंपनीकडे आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या चुकीच्या गोष्टी ग्राहकांना करता येणार नाहीत. मात्र मोफत कॉलिंगसाठी ठराविक कालावधीचे रिचार्ज करावे लागणार असल्याचेही कंपनीने सांगितले.