ऑनलाईन डेटिंग ही आजकाल अतिशय कॉमन गोष्ट आहे. सिंगल असणारे अनेक जण कधी सहज टाईमपास म्हणून तर कधी लग्न करायचे म्हणून ऑनलाईन डेटिंग करताना दिसतात. एकदा एखाद्या व्यक्तीविषयी थोडी माहिती मिळाली की त्या व्यक्तीचे फेसबुक प्रोफाईल, इन्स्टाग्राम, टर चेक केले जाते. आणि यावर असणाऱ्या माहितीवरुन आपण ज्याच्याशी किंवा जिच्याशी डेटिंग करत आहोत ती व्यक्ती कशी असेल याचा अंदाज बांधला जातो. मात्र व्हर्च्युअल जगात हरवल्याने आणि व्यक्तीला प्रत्यक्ष न भेटल्याने एखाद्या व्यक्तीची नेमकी इमेज मनात बांधणे योग्य नाही. बराच काळ ऑनलाईन डेटिंग केल्यावर त्या व्यक्तीविषयीचे काही संदर्भ अचानक समोर येतात आणि आपण चॅट करत असलेली व्यक्ती जे नाव आहे ती नव्हतीच किंवा तिची पार्श्वभूमी अतिशय वाईट असल्याचे समोर येते. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते. तेव्हा ऑनलाईन डेटिंग करताना कोणत्या गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी.

१. ऑनलाईन डेटिंग करताना आपण ज्या व्यक्तीशी संपर्कात आहोत तीची पार्श्वभूमी गुन्ह्याशी निगडीत नाही ना याची खात्री करावी. काही दिवस थांबावे लागले तरी योग्य ती खातरजमा करुन मगच संपर्क वाढवावा.

२. ऑनलाईन डेटिंग करताना एखाद्या व्यक्तीविषयी आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास ही माहिती काढून देण्याचे काम करणाऱ्या काही कंपन्या आहेत. तेव्हा अशा व्यावसायिक कंपन्यांकडून योग्य ती माहिती घेऊन मगच पुढे गेलेले केव्हाही चांगले.

३. अनेकदा ऑनलाईन डेटिंग करताना व्यक्ती आपल्याविषयीच्या काही गोष्टी लपवते. आपले आधी लग्न झाले होते की नाही किंवा आता आपण विवाहित आहोत अशा गोष्टी सांगत नाहीत. केवळ वेळ घालवण्यासाठी अशा पद्धतीचे उद्योग केले जातात. तेव्हा योग्य ती खात्री करुन मगच डेटिंग केलेले अधिक सुरक्षित ठरु शकते.

४. ऑनलाईन डेटिंग करताना सुरुवातीलाच आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी जास्तीच्या गोष्टी समोरच्याला सांगणे योग्य नाही. त्यामुळे समोरची व्यक्ती कशी आहे याचा अंदाज घेत आपल्या गोष्टी शेअर करणे हिताचे ठरु शकते.

५. आपण ऑनलाईन डेटिंग करत आहोत हे आपल्या जवळच्या मित्रमैत्रीणींना माहिती असावे. त्यांना या गोष्टीची कल्पना असल्याने भविष्यात काही अडचण आल्यास ते आपल्या मदतीसाठी उभे राहू शकतात.