सरासरी व्यक्तींच्या २० टक्के कमी शारीरिक तंदुरुस्ती असली तरीही हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब असे विकार टाळले जातात, असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. ‘जर्नल ऑफ कार्डिओपल्मोनरी रिहॅबिलिटेशन अँड प्रिव्हेन्शन’ या वैज्ञानिक नियतकालिकात या संशोधनाचे निष्कर्ष नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत.

जे लोक हृदयविकार नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करू शकत नाहीत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. त्यांच्या तंदुरुस्तीत लहानसे बदल झाले तरी ते पुरेसे आहे. तंदुरुस्तीचे फायदे मिळवण्यासाठी तुम्ही काही पट्टीचे धावपटू किंवा खेळाडू असण्याची गरज नाही, असे या संशोधन प्रकल्पाचे प्रमुख आणि कॅनडामधील माँट्रियल विद्यापीठाचे प्राध्यापक डॅनियल कर्नियर यांनी सांगितले.

या अभ्यासात सहभागी असलेल्या मॅक्सिम कारू यांनी सांगितले की, व्यायामाचा आणि चांगल्या शारीरिक तंदुरुस्तीचा एकंदर तब्येतीवर आणि हृदयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग होतो हे यापूर्वीच्या संशोधनातून माहीत होते. पण सर्वसाधारण तंदुरुस्त व्यक्तींपेक्षा २० टक्क्य़ांनी कमी तंदुरुस्ती असलेल्या व्यक्तींनीही थोडासा नियमित व्यायाम केला तर त्यांनाही त्याचे चांगले फायदे मिळू शकतात, हे या नव्या संशोधनातून दिसून आले.

त्यासाठी संशोधकांनी हृदयविकार असलेल्या २०५ पुरुष आणि ४४ स्त्रियांवर प्रयोग केला. त्यांना काही काळ व्यायाम करण्यास लावला. त्यातून असे दिसून आले की हृदयविकार बळावण्यासाठी असलेल्या आठपैकी पाच धोकादायक मुद्दय़ांच्या बाबतीत कमी तंदुरुस्त नागरिकांनी केलेल्या व्यायामाचाही उपयोग होतो. त्यात कमरेचा घेर, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा आणि अत्याधिक वजन अशा मुद्दय़ांचा समावेश होता. तसेच व्यायामामुळे हृदयविकाराबरोबरच सामसिक नैराश्यावरही मात करण्यास उपयोग होतो. नैराश्य हा हृदयरोगाच्या बाबतीत एक महत्त्वाचा धोकादायक मुद्दा आहे.

या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने सुचवल्याप्रमाणे आठवडय़ात १५० मिनिटे साधारण व्यायाम किंवा ७५ मिनिटे जोरदार व्यायाम करणे हितावह ठरते.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)