सध्या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. घरोघरी आणि ऑफिसेसमध्ये वाय-फाय सुविधा उपलब्ध असते. या वाय-फायला पासवर्ड दिलेला असतो. मात्र असे असूनही हे वाय-फाय सुरक्षित नसल्याचे समोर आले आहे. बेल्जियम विद्यापीठातील एका संशोधकांनी वाय-फाय प्रोटेक्टेड असणाऱ्या कनेक्शनवरही सायबर अॅटॅक होऊ शकतो असे म्हटले आहे. अलाहाबाद ते ऑकलंडपर्यंत विविध ठिकाणी चाचणी घेतल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला.

संशोधकांनी आपले संशोधन झाल्यानंतर नुकतेच एका ब्लॉगच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली. हा सायबर अॅटॅक सर्व आधुनिकरित्या सुरक्षित असणाऱ्या वाय-फाय नेटवर्कवर होऊ शकतो असेही त्यामध्ये म्हटले आहे. हा हल्ला ४१ टक्के अँड्रॉईड डिव्हाईसवर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. डिव्हाईस आणि ऑपरेटींग सिस्टिमचे वेंडर या सुरक्षिततेच्या अपडेटसवर काम करत आहे. अशाप्रकारे वाय-फायवर हल्ला चढविणे अवघड काम असल्याचे या विषयातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र तसे होत असल्यास ही गंभीर गोष्ट असून त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत याबाबत योग्य ती माहिती समोर येत नाही तोपर्यंत ग्राहकांनी वाय-फाय ऐवजी लॅन वापरावे असेही या संशोधकांचे म्हणणे आहे.

या सायबर हल्ल्याचे नाव ‘रिइनस्टॉलेशन अॅटॅक’ असे ठेवण्यात आले असून त्याला क्रॅक असेही म्हटले जात आहे. या समस्येवर मार्ग काढण्याचे काम सुरु असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. वाय-फायचा वापर करणाऱ्यांनी आपल्या वेंडर्सकडून याबाबत विस्तृत माहिती घ्यावी असेही सांगण्यात आले आहे.