तुम्हाला कोणत्या प्रकारची गाणी किंवा संगीत ऐकायला आवडतात? अनेकांना ‘सॅड साँग’ म्हणजेच उदास, वेदनादायी गाणी ऐकायला आवडते. जुन्या जमान्यातील ही गाणी श्रवणीय असतीलही पण त्यांच्या सततच्या श्रवणाने मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा दावा हेलसिंकी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे.
‘फ्रंटियर इन ह्युमन न्युरोसायन्स जर्नल’च्या ताज्या अंकात हेलसिंकी विद्यापीठाच्या या शास्त्रज्ञांचा संशोधनात्मक लेख प्रसिद्ध झाला आहे. जे लोक सातत्याने उदास, वेदनादायी गाणी ऐकतात, त्यांना उदासीनतेचा, तणावपूर्ण राहण्याचा किंवा मनोविक्षुब्धतेचा मानसिक आजार जडतो. अशा प्रकारचे लोक सातत्याने उदासीनतेत राहतात, सतत तणावात राहायला त्यांना आवडते. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीला धीराने तोंड देऊ शकत नाही, असे या लेखात सांगण्यात आले आहे.
या संशोधकांच्या गटाने काही लोकांचा अभ्यास केला. हे लोक कोणत्या प्रकारचे संगीत ऐकतात, हेही तपासण्यात आले.
त्यात उदास संगीत ऐकणाऱ्या लोकांमध्ये मानसिक आजार आढळले. चिंताग्रस्त, भयग्रस्त, सतत तणावात अशा प्रकारचे आजार या रुग्णांना जडल्याचे आढळले, असे संशोधक गटाच्या प्रमुख एल्विरा ब्रॅटिको यांनी सांगितले.
संगीतश्रवणाचा आपल्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत असतो. उदास गाण्यांच्या सतत श्रवणाने मेंदूवर परिणाम होऊ शकतो. असे लोक सातत्याने चिंताग्रस्त असतात, त्यांच्या मनात नकारात्मक भावना निर्माण होत असते आणि हे मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही, असे ब्रॅटिको यांनी सांगितले.
एखादे गाणे श्रवणीय असू शकते. पण त्याकडे चांगले संगीत म्हणून पाहिले पाहिजे. त्याचा अधिक परिणाम आपल्या मानसिक अवस्थेवर झाला नाही पाहिजे, असा सल्लाही ब्रॅटिको यांनी दिला.