दहा वर्षांपूर्वी फोल्डिंगच्या मोबाइलचे वेड तरुणाईला होते. अॅंड्रॉइडचा जमाना आल्यानंतर हे फोल्डिंगचे मोबाइल वापरातून बाद झाले. फोल्डिंगच्या मोबाइलबाबत असणारे आकर्षण अद्यापही कमी झाले नसल्याचे अनेक पाहण्यांमधून समोर आले आहे. तेव्हा फोल्डिंग मोबाइल पुन्हा बाजारात आणण्याचा विचार सॅमसंगने केला आहे.  बार्सेलोना येथे वर्ल्ड मोबाइल काँफरंस सुरू आहे. या काँफरंसमध्ये सॅमसंगने फोल्डिंगचा मोबाइल शोकेस केला आहे. पुढील वर्षी हा फोन बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहू शकेल. या फोनचे नाव गॅलक्सी एक्स हे आहे. अॅंड्रॉइडवर चालणारा हा पहिला स्मार्टफोन ठरणार आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून सॅमसंग कंपनी या फोनच्या निर्मितीसाठी झटत होती. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे २१:९ या प्रमाणात डिस्प्ले आहे. या स्क्रीनचा वापर कसा होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. हा डिस्प्ले अर्ध्यातून फोल्ड करता येणार आहे. एखाद्या पैशांच्या पाकिटाप्रमाणे या फोनची रचना असेल. ओलेड डिस्प्लेचा वापर करुन फोल्डिंग फोन बाजारात आणण्याची आमची योजना होती. ती या फोनच्या रुपाने अस्तित्वात आली आहे असे सॅमसंगचे ली चांग हून यांनी म्हटले आहे. या फोनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आत्ताच सुरू करण्यात येणार नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले. काही बाबींची पूर्तता झाल्यानंतरच या फोनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले जाईल असे ते म्हणाले.

गेल्या काही येथे होणाऱ्या मोबाइल वर्ल्ड काँफरंसला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. बार्सेलोना येथे होणाऱ्या या वर्ल्ड काँफरसला जगातील सर्व प्रमुख मोबाइल कंपन्यांनी आपले प्रदर्शन भरवले आहे. आपण वर्षभर करत असलेले काम जगासमोर आणण्यासाठी हे एक योग्य व्यासपीठ समजले जाते. सॅमसंग, लिनोव्हो, शिओमी, एलजी, एचटीसी या कंपन्या आपले फोन बऱ्याचदा अशाच कार्यक्रमाच्या माध्यमातूनच लाँच करतात. प्रत्येक कंपनी आपली वेगळी पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आपले कार्य मांडत असते. जगातील प्रतिष्ठित मोबाइल प्रदर्शनांपैकी एक म्हणून मोबाइल वर्ल्ड काँफरंस गणली जाते.