“बाॅस, यावेळी चांगले मार्क्स आणले नाहीत तर घरी मोठा फटका बसणार”

“बाबांनी काय फटकावला काल रिझल्टनंतर”

अशा प्रकारची वाक्य विद्यार्थ्यांकडून वरचेवर एेकू येण्याचा काळ आता थोडा मागे पडत असला तरी ही वाक्य अजूनही काही अगदीच अनोळखी नाहीयेत. आजकालचे पालक आपल्या मुलांच्या कलाने घेत त्यांच्या आवडीनिवडी समजावून घेत त्यांच्या करिअरला योग्य आकार देत आहेत हे खरं आहे. पण नाही म्हटलं तरी चागले मार्क मिळवण्याचं एक प्रेशर सगळ्याच विद्यार्थ्यांवर असतं.बेफिकिर असण्यापेक्षा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असलेलं हे प्रेशर परीक्षेत चांगलं यश मिळवायला उपयोगी ठरतंही. पण याबाबतीत पालकांच्या दहशतीखाली असलेली मुलं अनेकदा अभ्यासात चांगलं यश मिळवू शकत नाहीत. हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण पालकांच्या अशा वागण्याचा मुलांच्या जीवनावर यापलीकडेही जात मोठा परिणाम होतो असं आता आढळून आलंय

अमेरिकेच्या पिट्सबर्ग युनिव्हर्सिटीमधल्या अभ्यासकांनी  अनेक वर्ष केलेल्या या अभ्यासाचे निष्कर्ष त्यांनी आता जगापुढे मांडले आहेत. नऊ वर्ष चाललेल्या या अभ्यासात या अभ्यासकांनी जवळजवळ दीड हजार विद्यार्थ्यांची सतत पाहणी केली.

यादरम्यान त्यांची निरीक्षणं आणि निष्कर्ष बोलके आहेत. वाढत्या वयात मुलांचा आपल्या आईवडिलांशी चांगला संवाद असणं आवश्यक असतं. जर याच वयात आईवडिलांनी जर दहशतीच्या जोरावर या मुलांशी आपलं नातं पुढे नेलं तर या वयात नैसर्गिकरीत्या अशी मुलं आपल्या मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात भावनिक आधार शोधतात. यात तसं वाईट काहीच नाही पण फक्त भावनिक आधार शोधण्याच्या भरात योग्य  मित्रांसोबत मैत्री होते आहे का यावर बरंच काही अवलंबून असतं. अशा वेळी आईवडिलांचं न एेकता नियम तोडण्याची प्रवृत्ती जास्त बळावते असं निरीक्षण या अभ्यासकांनी नोंदवलंय. आपल्या मुलांना पालकांनी सतत दहशतीखाली ठेवल्याने त्यांच्या जीवनाच्या अनेक क्षेत्रांवर परिणाम होतो. अशा स्वरूपाचं लहानपण अनुभवलेल्या मुलांचा कल पुढे चोरी करणं, हिंसाचाराला प्रवृत्त होणं तसंच कमी वयात लैंगिकतेकडे प्रमाणाबाहेर वळणं अशा अनेक बाबींकडे वळतो.

पण याउलट आपल्या मुलांशी एक हेल्दी नातं जोपासलं तर मुलं तणावरहित वातावरणात स्वयंप्रेरणेने अभ्यास करतील आणि चांगले मार्क मिळवतील. आणि फक्त चांगल्या मार्कांच्या अट्टाहासापोटी घातलेली दहशत नाहीशी होत त्याचं पुढच्या जीवनात होणारं नुकसानही टळेल.

हे सगळं वाचून घाबरून जायचं काहीच कारण नाही. पण आपल्या मुलांशी योग्यप्रकारे संवाद साधत त्यांना त्यांच्या जीवनात पुढे जाण्यासाछी मदत करणं तसंच आपले आईवडील आपल्याला मदत करण्याच्या उद्देशाने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत याचं भान मुलांनीही ठेवणं आवश्यक आहे.