अपुऱ्या झोपेमुळे हृदयविकाराचा धोका असल्याचा दावा अमेरिकी वैद्यकीय तज्ज्ञांनी केला आहे. पाळय़ांमध्ये काम करणाऱ्या लोकांचे दैनंदिन झोपेचे चक्र बिघडलेले असते. त्यामुळे त्यांची झोप अपुरी झालेली असते. अशा लोकांना हृदयविकाराचा अधिक धोका आहे, असे या तज्ज्ञांनी सांगितले.
पाळय़ांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या शारीरिक क्रियेमध्ये बिघाड झालेला आढळतो. शरीर थकलेले असते आणि त्याचा हृदयावर ताण पडतो. त्याशिवाय गंभीर निद्रानाश झालेल्या लोकांच्या हृदयावर ताण येतो. त्यामुळे अशा लोकांना हृदयविकाराचा धोका असलेल्याचे नॉर्थ वेस्टर्न विद्यापीठाच्या वैद्यकीय संशोधकांनी सांगितले.
या संशोधकांनी अपुरी झोप होत असलेल्या आणि निद्रानाश झालेल्या २०-३९ वयोगटातील २६ व्यक्तींचा अभ्यास केला. या व्यक्ती आठ दिवसांत केवळ पाच तास झोप घेत असल्याचे आढळून आले. त्यांच्या अपुऱ्या झोपेचे कारण म्हणजे झोपण्याची नियमित वेळ न पाळणे. नियमित वेळेत झोपण्यास न गेल्याने त्यांना उशिरापर्यंत झोप लागत नाही. त्यामुळे त्यांना रक्तदाब आणि अन्य आजार आढळून आल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
झोप कमी झाल्याने त्यांच्या एकूणच आरोग्यावर परिणाम होऊन ते हृदयविकाराला निमंत्रण देत असतात, असे या संशोधकांनी सांगितले. दररोज किमात ७ ते ८ तास झोप आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. हे संशोधन ‘जर्नल हायपरटेन्शन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)