धूम्रपानामुळे मानवी शरीरातील पेशींवर पडणाऱ्या खुणा ३० वर्षांपर्यंत टिकत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात स्पष्ट झाले आहे. तसेच धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका मोठय़ा प्रमाणात वाढतो आणि इतर रोग होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.

डीएनए मिथिलिकरण प्रक्रियेत नसांचे पेशींच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीने केलेल्या धूम्रपानाचा इतिहास सहजपणे उपलब्ध होतो आणि त्यामुळेच संशोधकांसमोरील आव्हान आणखी मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. हे निकाल अतिशय महत्त्वाचे असून त्यामुळे मिथिलिकरण प्रक्रियेमुळे पेशींच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण राखले जात असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळेच संबंधित व्यक्तीला धूम्रपानाशी संबंधित रोग होण्याचा धोका मोठय़ा प्रमाणात वाढतो, असे अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ सायन्स येथील स्टेफनी जे. लंडन यांनी स्पष्ट केले.

एखाद्याने धूम्रपान करणे थांबविले तरी धूम्रपानामुळे झालेले परिणाम त्या व्यक्तीच्या डीएनए चाचणीत दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या व्यक्तीने दहा वर्षे धूम्रपान करून ते थांबविले तरी त्याला कर्करोग होण्याचा धोका कायम असतो. संशोधकांनी सोळा हजार व्यक्तींच्या रक्ताचे नमुने घेऊन हे संशोधन मांडले आहे. धूम्रपान करणारे, न करणारे आणि धूम्रपान थांबविलेले अशा व्यक्तींचे गट या संशोधनासाठी करण्यात आले होते.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)