पुढील सात वर्षांमध्ये देशातून एड्सला हद्दपार करण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय धोरणात्मक योजना तयार केली आहे. यामुळे एड्सबाबतच्या उपचारासाठी अनेक उपाय करण्यात येणार असून, याचा अनेक रुग्णांना फायदा होईल, असे सरकारने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने ‘एचआयव्हीसाठी चाचणी आणि औषधोपचार’ धोरण तयार केले आहे. या चाचणीमध्ये रुग्णाला एचआयव्ही झाल्याचे आढळल्यास त्याच्यावर एआरटी थेरपी करण्यात येईल.

ज्या पुरुष, महिला, किशोरवयीन आणि मुले यांना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळेल, त्यांच्यावर हे उपचार करण्यात येणार आहेत. या तात्काळ उपचारामुळे संबंधित व्यक्तीला दीर्घायुष्य लाभेल. त्याच्या जीवनाचा दर्जा सुधारेल आणि टीबीसारख्या संसर्गजन्य आजारापासून रुग्णांचे संरक्षण होण्यास मदत होणार असल्याचे, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे पी नड्डा यांनी म्हटले आहे.

२१ लाख एचआयव्ही झालेल्या रुग्णांपैकी केवळ फक्त १४ लाख रुग्णांना ओळखण्यात यश आले आहे. इतरांना शोधण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. आम्ही राष्ट्रीय एचआयव्ही तपासणी सुधारित केली असून, समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचे आमचे ध्येय आहे. या व्यक्तींचे समुपदेशन होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारकडे सध्या १,६०० एआरटी असून, देशभरात या माध्यमातून उपचार करण्यात येत आहेत. सध्या आम्ही १० लाख लोकांवर एआरटी केली आहे. मोठय़ा प्रमाणात उपचार करणारा भारत हा दुसऱ्या क्रमाकांचा देश आहे.