१. पाणी उकळून , गाळून प्या . उकळी आल्यावर १० मिनिटे उकळत ठेवावं. अपायकारक जंतू नष्ट होतील. उकळलेलं पाणी २४ तासात वापरा .

२. पचनशक्ती , रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी आहारात आलं, लसूण, पुदिना, हिंग, हळद, मिरे, जीरे , धने वापरा . पदार्थ शिजवताना सैंधव मीठ वापरा .

३. आल्याची पेस्ट + सैंधव मीठ + लिंबाचा रस + मध यांचं ताजं मिश्रण प्रत्येक जेवणाआधी, निदान नाश्त्या आधी तरी घ्या.

४. एक लिटर पाण्यात १ -२ चमचे धने पूड / ५ -६ लवंगा / ४ – ५ चमचे मध घालून पाणी उकळून वापरा.

५. Anti-oxidants देणारी आंबट फळं, गडद रंगांच्या भाज्या आणि फळं, सॅलाड, तेलबिया यांचा वापर आवर्जून करा.

६. पालेभाज्या, कोबी, फ्लॉवर सारख्या भाज्या मिठाच्या पाण्यात १० मिनिटे बुडवून ठेऊन वापरा. कीड, अळ्या असतील तर मरून जातील.
काय टाळाल ?

१. रस्त्यावरचे , उघड्यावरचे , शिळे , माशा बसलेले , पदार्थ . अस्वच्छतेमुळे जंतुसंसर्गाचा धोका वाढतो .

२. गाड्यांवर , दुकानात मिळणारे न शिजवलेले पदार्थ , म्हणजे सॅंडविचेस , चाटचे प्रकार , भेळ , पाणीपुरी सारखे पदार्थ .

३. रस्त्यावरचे कच्चे पदार्थ – फ्रुट प्लेट , फ्रुट ज्यूस, उसाचा रस , नीरा , यांमधूनही जंतुसंसर्ग होऊ शकतो , पोट बिघडू शकते .

४. मासे , प्रॉन्स, खेकडे यांचा या सुमारास ब्रिडिंग काळ असतो . खराब हवामानामुळे मासे पकडले जात नाहीत. त्यामुळे मासे शिळे असण्याची शक्यता जास्त असते.

५. पचायला जड पदार्थ – खव्याचे , मैद्याचे , अति तेलकट पदार्थ .

६. रेड मिट, कच्चं मटण, मटणाचे मसालेदार, झणझणीत पदार्थ जास्ती खाऊ नयेत . पावसाळ्यात वात दोष वाढतो, पाचक रसांचा समतोल बिघडतो. चयापचयावर अपायकारक बदल होतो म्हणून काळजी घ्यावी.

असा बनवा हर्बल टी

साहित्य : गवती चहा कापून – १ /४ वाटी , तुळस पाने – १/४ वाटी, सुंठ पावडर – दीड चमचा , ज्येष्ठमध पावडर – दीड चमचा .
कृती : अर्धा कप पाणी उकळत ठेवा. त्यात गवती चहाची कापलेली पाने, तुळशीची पाने , घाला. २ मिनिटे उकळावे. गॅस बंद करून २ मिनिटे झाकून ठेवा. गाळून घ्या. १/२ कप उकळतं पाणी घालून सर्व्ह करा.

गवती चहा – यामध्ये सेलिसीसाईटस असतात. त्यामुळे अंगदुखी, ताप कमी होतो .
तुळस – सर्दी, ताप विरुद्ध प्रतिकारशक्ती वाढते .
सुंठ – जंतुनाशक , anti inflammatory ( जंतुसंसर्गामुळे होणारा दाह नाहीसा करणारे ). त्यांच्यातील phytonutrients मुळे जंतुसंसर्गापासून बचाव करायला मदत होते.
ज्येष्ठमध – घशाच्या आरोग्यासठी, खोकल्याचा त्रास कमी करायला मदत होते. प्रतिकारशक्ती वाढते.
सुकेशा सातवळेकर, आहारतज्ज्ञ