दुसऱ्यांसमोर बॉससोबत संवाद साधणे म्हणजे जणू पब्लिक टेस्टच. वरिष्ठांशी संवाद साधताना तुमची व्यावसायिकता आणि सभ्यता निदर्शनास येते. बॉसला दिलेल्या उत्तरावरूनच लोकांचे तुमच्याबाबतचे मत पक्के होत असते. जरी बॉस तुमचा मित्र असला तरी, बॉसशी संभाषण साधताना तुमचे वर्तन हे नेहमी व्यावसायिक असायला हवे. बॉससोबत संवाद साधताना या पाच गोष्टी टाळा.
१. हे काम होऊ शकत नाही
बॉसने तुम्हाला एखादे काम करण्यास सांगितल्यास कदापि नकार देऊ नका. जर तुमच्याकडे आधीपासूनच काम असेल आणि बॉस तुम्हाला अधिक काम देत असेल तर कोणते काम अगोदर पूर्ण करणे गरजेचे आहे याबाबत बॉसकडे विचारणा करा. समजदार बॉस नक्कीच तुमची मदत करेल.
२. यात माझी काही चूक नव्हती
कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे एक टीम म्हणून पाहिले जाते. स्वत:ची चूक लपवून त्या चुकीसाठी टीममधील अन्य कोणास जबाबदार धरणे हे बरोबर नाही. असे करून तुम्ही काही काळासाठी वाचू शकता, पण प्रत्येक वेळी ते शक्य नाही. चुकीचा स्वीकार केल्याने लोकांचा तुमच्यावरील विश्वास वाढतो.
३. मला हे काम सांगण्यात आले नव्हते
तुमचे काम वेळेत संपवून तुम्ही पुढील कामाला सुरुवात करणे अपेक्षित असते. तुम्हाला सांगून काम करून घेण्यासारखी परिस्थिती निर्माण होता कामा नये. जर तुम्ही बॉसकडेच सतत काम मागत राहिलात तर तुम्हाला काम सांगावे लागते हे यातून सिद्ध होते. ही बाब खचितच चांगली नाही.
४. हा माझा प्रॉब्लेम नाही
कर्मचारी वरिष्ठ पदावर जात असताना त्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होत असते. कठीण प्रसंगी अथवा जास्त काम असताना प्रत्येकाला कनिष्ठ कर्मचाऱ्याची मदत घ्यावी लागते. अशा एखाद्या प्रसंगी जर बॉसला तुमच्या मदतीची अवश्यकता भासली, तर याच्याशी मला काही घेणे-देणे नाही अथवा हा माझा प्रॉब्लेम नाही असे उत्तर देऊ नका.
५. सध्या मी व्यग्र आहे
आता मी व्यग्र असून मी हे करू शकत नाही, असे बॉसला कधीही सांगू नका. जर तुम्ही खरोखरी व्यग्र असाल, तर तुमच्या गडबडीत असण्याचे कारण बॉसला सांगा. अथवा हातातील कामाला अमूक एक वेळ लागेल असे सांगा. यामुळे बॉसला तुमच्या उत्तराचे वाईट वाटणार नाही आणि बॉस कदाचित ते काम अन्य कर्मचाऱ्याकडून करून घेईल.