गेल्या दहा वर्षात दोन व्यक्तींमधील संभाषणात मोठा फरक पडला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे थेट संभाषणाची जागा व्हर्च्युअल संभाषणाने घेतली आहे. नव्या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने या माध्यमामधून होणारे संभाषण जरी जलद प्रकारचे असले तरीही यामध्ये तितकेच संभाव्य धोकेही आहेत. या नव्या माध्यमांचा वापराने तुमच्या वैयक्तिक आयुष्यात प्रचंड उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे त्याचा वापर करताना काही बाबतीत खबरदारी घ्यायलाच हवी.
१. फेसबुक, मायस्पेससारखे नवी सोशल माध्यमे तुम्ही वापरत असाल तर जुन्या मित्र-मैत्रीणींशी संपर्क कऱण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटचा वापर बऱ्याचदा नवे मित्र मैत्रिणी बनवण्यासाठी होताना दिसतो. पण यासारख्या फ्रेंडींग वेबसाईटचा वापर करून तुम्ही चटकन एखाद्याला मित्र किंवा मैत्रीण बनवाल खरे, पण त्यामुळे कदाचित तुम्हाला पुढे धोका निर्माण होऊ शकतो.

२. एकटेपणा घालवण्यासाठी सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा वापर करणे टाळा, कारण तुम्ही एका अनोळखी व्यक्तीसोबत भावनेने गुंतून जाण्याची शक्यता जास्त असते. त्याचा भविष्यात मानसिक आणि भावनिक त्रास होऊ शकतो.

३. सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर स्वतःची वैयक्तिक माहिती इतर लोकांना सांगताना काळजी घ्या. जसे मोबाईल नंबर, घराचा पत्ता, इत्यादी गोष्टी नोंदवू नका.

४. सोशल नेटवर्किंग वेबसाईट वरून लोकांना भेटणे टाळा, समोरच्या व्यक्तीची योग्य ती ओळख पटली तरच त्याला भेटण्यास जाणे सुरक्षित आहे.

५. Linkedin सारख्या सोशल बिझनेस नेटवर्किंग वेबसाईट वरून नोकरी साठी प्रयत्न करत असाल तर त्यातील एखाद्या कंपनीची माहिती खरी आहे की नाही ते तपासून पाहा. त्या कंपनीचे मुख्य कार्यालय तुमच्या आसपास असेल तर एकदा प्रत्यक्ष भेट देऊन या.

६. जो मोबाईल क्रमांक तुमच्या बँक खात्याशी जोडला गेला असेल तो इतर कंपन्यांना देऊ नका. whatsapp, paytm सारखी सोशल अॅप्लिकेशन्स वापरण्यासाठी एखादा वेगळा क्रमांक ठेवा.

७. तुम्ही सोशल नेटवर्किंग साईट वर security चे ऑपशन्स नीट पाहून तुमची प्रोफाइल अनोळखी लोकांनी पाहण्यापासून थांबवू शकता. त्याचा योग्य तो वापर करा. स्वतःच्या फॅमिलीचे फोटो, लहान मुलांचे, मुलींचे फोटो टाकताना खबरदारी घ्या. त्याचा वापर इतर वाईट कामांसाठी केला जाऊ शकतो.

८. घरातील लहान मुलांना या सोशल वेबसाईट वरून जितके लांब ठेवू शकाल तितके ठेवा. त्यांना आत्तापासूनच प्रत्यक्ष भेटून गप्पा मारण्यात, मैत्री म्हणजे नक्की काय, पुस्तके वाचण्यातील आनंद या सारख्या गोष्टीची सवय लावा आणि या सोशल नेटवर्किंग वेबसाईटचा वापर फक्त योग्य ती माहिती योग्य माणसापर्यंत योग्य पद्धतीने पोहचवण्यासाठीच करा.

अवधूत नवले