बाजारात एखादा नवीन स्मार्टफोन दाखल झाला की तो आपल्याकडे असावा असे आपल्याला वाटते. आयफोनच्या नवीन मॉडेल्सची वाट पाहणार एक वर्ग आहे. नुकत्याच आलेल्या आयफोन एक्सच्या २५६ जीबी मेमरीच्या टॉप मॉडेलची किंमत साधारण एक लाखाच्या घरात आहे. आता किंमत इतकी असल्यावर त्यात काय काय सुविधा असणार विचारायलाच नको. दिवसातला सर्वाधिक वेळ मोबाईलवर असणाऱ्या आताच्या पिढीला मोबाईल कंपन्या खऱ्या अर्थाने वश करत असल्याचेच चित्र आहे. पण या फोनकडे एक गुंतवणूक म्हणून पाहिले तर ?

कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूची किंमत उत्तरोत्तर कमी होत जाणारी मालमत्ता असते. या वस्तूची किंमत आपण खरेदी केल्याच्या क्षणापासून कमी होत जाते. परंतु, संपत्ती निर्माण करण्यासाठी किंमत वाढणारी मालमत्ता घ्यायला हवी. उदा. स्थावर मालमत्ता, म्यूचुअल फंड्स, सोने इत्यादी. काही वेळा किंमत कमी होणारी संपत्तीसुद्धा खरेदी करणे गरजेचे असते. खाली दिलेली आर्थिक सुजाणपणाची कामे तुम्ही आधीच केलेली असतील तर तुम्हाला या चैनीचा आनंद नीट घेता येईल पण तसे केले नसेल तर आधी या गोष्टींचा विचार करा.

दोन कोटींचा आयुर्विमा उतरून घ्या

जर कोणी तुमच्यावर अवलंबून असेल, तर तुम्हाला त्यांच्या दीर्घ-मुदतीच्या आर्थिक व्यवस्थेसाठी टर्म विमा प्लॅन घ्यायला हवा. एक कमावता पुरूष, वय वर्षे ३० ज्याला कुठलेही व्यसन नसेल, अशा व्यक्तीला २ कोटीचे विमा कव्हर ३० वर्षासाठी घेण्यासाठी वर्षाकाठी साधारण २१ हजार प्रीमियम लागेल. तुम्ही कुठलीही चैन स्वतःसाठी करण्याआधी हा विमा करून घेणे तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांच्या दृष्टीने गरजेचे आहे. पुरेसे विमा कव्हर तुमच्या प्रियजनांचे आर्थिकदृष्ट्या रक्षण करेल आणि तुमचे घरभाडे किंवा ईएमआय, तसेच मुलांचे शिक्षण इत्यादी दीर्घ-मुदतीच्या आर्थिक गरजांची तरतूद होईल.

आर्थिक व्यवहार पेपरलेस होतील?

पाच लाखांचा आरोग्य विमा घ्या

प्रत्येकाची स्वतःची आरोग्य विमा पॉलिसी हवीच. तरीही, भारतात फार कमी लोक हा विमा घेतात आणि घेतल्यास पुरेशा रकमेचा घेत नाहीत. धक्कादायक म्हणजे अतिशय धनिक अशा ६६ टक्के लोकांनीसुद्धा हा विमा घेतलेला नव्हता. याने आरोग्य विमाबद्दल जाणिवेची कमतरता कळून येते. हा विमा तुम्हाला दवाखान्याच्या अवाढव्य खर्चांपासून वाचवतो. जर तुम्ही ३० वर्षे वयाचे असाल आणि कुटुंबात एक मूल असेल, तर तुम्हाला ५ लाखांचा फॅमिली फ्लोटर प्लॅन अंदाजे ११,५०० एवढ्या प्रीमियममध्ये मिळू शकेल. जर तुम्ही एकटेच असला, तर यापेक्षा बऱ्याच कमी किमतीत हा प्लॅन तुम्हाला मिळू शकेल. जर तुम्ही आरोग्य विमा आधीच घेतलेला असेल, तर त्याला वाढवून घ्या. जर तुम्ही अशा वयाचे असाल, ज्यात आरोग्यासंबंधी समस्या अधिक असतात, तर नक्कीच विचार करा.

म्युचुअल फंड

म्युचुअल फंड सध्या गुंतवणुकीसाठी फार प्रसिद्ध होत आहेत आणि तसे होण्यास कारणे सुद्धा आहेत. बहुतांश म्युचुअल फंड योजनांमध्ये तुम्ही ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. तुम्ही दर महिन्याला किंवा एकरकमी गुंतवणूक करू शकता. तुम्हाला गरज असेल तेव्हा यातून पैसे काढू शकता. विशेष म्हणजे संपत्ती निर्माण करणे, कर वाचविणे किंवा इतर गुंतवणूक अशा कोणत्याही कारणासाठी तुम्ही ही गुंतवणूक करु शकता. गेल्या दहा वर्षांत इक्विटी म्युचुअल फंड या प्रकारच्या फंडांचे उत्पन्न वार्षिक १० ते १५ टक्के झाले आहे. जर तुमच्याकडे शिलकी भांडवल असेल, तर त्याची गुंतवणूक म्युचुअल फंडात करण्याबद्दल विचार करा आणि मगच महागडा स्मार्टफोन विकत घ्या.

तुमचे कर्ज पूर्ण करा

गेल्या तीन वर्षांत व्याजाचे दर कमी होत गेले आहेत. ऑगस्टमधील दरकपातीनंतर आता लवकरच आणखी कमी होणे कठीण दिसते. ही वेळ तुमचे गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा इतर महागडे कर्ज यांच्याकडे बारकाईने पाहण्याची आहे. या कमी दराच्या संधीचा वापर मुद्दल कमी करण्यासाठी करून घ्या. अशाने तुम्ही दीर्घकालीन बचत बरीच करू शकाल – विशेषकरून जर तुमच्या कर्जाच्या मुदतीचा हा सुरूवातीचाच काळ असेल तर.

नवरात्रीनिमित्त ‘या’ मोबाईल्सवर फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनकडून बंपर सूट

संकटकालीन निधी

आणीबाणी सांगून येत नसते. नोकरी जाणे, अपघात किंवा मालमत्तेचे नुकसान होणे कशा घटना कधीही होऊ शकतात. अशा वेळेसाठी प्रत्येकाला एक संकटकालीन निधी करून ठेवणे गरजेचे असते. साधारपणे हा निधी तुमच्या मासिक उत्पन्नाच्या तीन ते सहा पट असायला हवा आणि हा तुमचे नियमित खर्च म्हणजेच घरभाडे, ईएमआय, वाणी, विमा प्रीमियम, वीज-पाणी इत्यादी खर्चांसाठी पुरेसा हवा. जर तुम्ही अजून संकटकालीन निधी तयार केला नसेल, तर तुमच्या शिलकी भांडवलातून आधी तयार करून घ्या. जर केलेला असेल, तर तुमच्या आत्ताच्या उत्पन्नाप्रमाणे त्यात भर घाला.

जर तुम्ही या आधी ही कामे केलेली नसतील, तर हा सल्ला आहे की तुम्ही फोन खरेदी करणे पुढे ढकलावे. एकदा तुमच्याकडे विमा आणि संकटकालीन निधीचा भक्कम पाया तयार झाला, की त्यानंतर तुम्ही चैन करण्याबद्दल विचार करू शकता.

– आदिल शेट्टी

सीईओ, बँकबझार