अपुरे ज्ञान, गरिबी आणि आदिवासी भागात उपचार करण्यासाठीची अपुरी साधणे यामुळे भारतात क्षयरोगाचे (टीबी) प्रमाण वाढत असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सर्वसाधारण लोकांमध्ये क्षयरोगाच्या आजाराबाबत असलेले अज्ञान आणि सामाजिक असमानता यामुळे भारतातील क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

आदिवासी, झोपडपट्टीत राहणारे आणि अनाथालये यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहोचत नसल्यामुळे क्षयरोगाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते, असे ‘केअर इंडिया’ आंतराष्ट्रीय संस्थेच्या आरोग्य विशेषज्ञ रिता प्रसाद यांनी म्हटले आहे.

मागील महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये भारत सरकारने २०२५ पर्यंत भारतातून क्षयरोग हद्दपार करण्याची घोषणा केली आहे. तथापि, सरकारकडून दुर्लक्षित घटकांना सक्षम करण्यासाठी कोणताही कार्यक्रम आखला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

आदिवासी समाजामध्ये क्षयरोग होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. मात्र सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामुळे काही भौगोलिक भागात मर्यादित प्रमाणात यश येत असल्याचे दिसून येत असल्याचे, एड्स हेल्थकेअर संस्थेचे देशातील व्यवस्थापक डॉ. व्ही. सॅम. प्रसाद यांनी म्हटले आहे.

आदिवासी भागामध्ये क्षयरोग असणाऱ्या लोकसंख्येचे प्रमाण वाढत असून, यामुळे क्षयरोग रोखण्यासाठी सरकारला अपेक्षित यश मिळत नसल्याचे यातून दिसून येते. भौगोलिक कारणांमुळे क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी सेवा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. डोंगराळ भाग आणि गरिबीमुळे उपचार करण्यात अडचणी निर्माण होतात. यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘जागतिक क्षयरोग अहवाल २०१६’ नुसार, क्षयरोग रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून, भारतामध्ये त्याचे प्रमाण वाढत आहे. भारतामध्ये क्षयरोगाच्या रुग्णांची संख्या २०१५ मध्ये १.७ दशलक्षवरून २.८ दशलक्षवर पोहोचली आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे.