वजन कमी करायचे तर हे खा, ते करा असे सल्ले लठ्ठ व्यक्तींना सातत्याने देण्यात येतात. यामध्ये आहारतज्ज्ञांबरोबरच घरातील व्यक्ती आणि मित्रमंडळीही पुढे असतात. मात्र काही पेयांमुळेही वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हे सोपे उपाय वेळीच जाणून घेणे अतिशय गरजेचे आहे. या पेयांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पाहूयात काय आहेत हे उपाय…

पाणी

आरोग्याला सर्वात फायदेशीर कोणते पेय असेल तर ते म्हणजे पाणी. पाण्याला जीवन म्हटले जाते ते खरेच आहे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक असते. यामुळे अनेक शारीरिक अडचणींपासून सुटका होते. यामध्ये थोड्या प्रमाणात लिंबू पिळल्यास तेही फायदेशीर ठरु शकते.

व्हेडिटेबल सूप

जंकफूड खाण्याच्या ऐवजी व्हेजिटेबल सूप घेणे वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. यामुळे आपण आहारातून घेत असलेल्या कॅलरीज कमी होण्यासही मदत होते. तसेच सर्व भाज्या शरीरात जातात ज्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात.

ग्रीन टी

ग्रीन टी आरोग्यदायी असतो असे म्हटले जाते मात्र तो कधी आणि कसा घ्यावा याचेही काही नियम आहेत. ते पाळून ग्रीन टी घेतल्यास तो अतिशय उपयुक्त ठरु शकतो. शरीरातील ग्लुकोज आणि साखर कमी करण्यासाठी ग्रीन टीचा उपयोग होतो. त्यामुळे शरीरातील फॅटस जळण्यासही मदत होते आणि ग्रीन टी हा वजन करण्याचा उत्तम उपाय ठरतो.

काळी कॉफी

शरीरातील फॅटस बर्न करण्यासाठी आणि मेटाबॉलिझम चांगला रहावा यासाठी काळी कॉफी अतिशय उपयुक्त असते. आपण ज्यावेळी आराम करतो त्यावेळी या कॉफीतील कॅफेन हा पदार्थ फॅट्स बर्न करण्याचे काम करतो. त्यामुळे तुम्हाला चहा किंवा कॉफी घेण्याची इच्छा झाल्यास काळी कॉफी घेणे हा अतिशय उत्तम उपाय ठरु शकतो.

स्कीम्ड मिल्क

दूध हे आरोग्यासाठी कायमच चांगले असते. मात्र त्यातील स्निग्धांश कमी करुन हे दूध घेतल्यास ते नक्कीच आरोग्यदायी असते. जन्मापासून दूध हेच मुख्य अन्न असल्याने ते आयुष्यभर उपयुक्त ठरते. दुधामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने असतात, जी आरोग्याला उपयुक्त ठरु शकतात. हाडे मजबूत राहण्यासाठीही दूधाचा उपयोग होतो.