आपल्या मुलाची उंची वाढत नाही म्हणून अनेक पालक चिंतेत असतात. मग त्याला उंचीवरुन टोमणे मारणे, त्यासाठी विविध प्रयत्न करणे, प्रसंगी मुलाला डॉक्टरांकडेही नेले जाते. मात्र योगशास्त्रात उंची वाढण्यासाठी एक उत्तम आसन सांगितलेले आहे. हे आसन नियमित केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. गरुडासान हे दंडस्थितीतील आसन आहे. पाय सशक्त होण्यासाठी गरूडासन करतात. यामध्ये एका पायावर शरीराचा तोल सांभाळला जातो. प्रथम दोन्ही पायांवर स्थिर उभे रहावे. उजवा पाय सरळ ठेवावा. डावा पाय उजव्या पायाच्या गुडघ्यावरून घेऊन त्याला विळखा घालावा. जेवढा जमेल तेवढा डाव्या पायाने उजव्या पायाला विळखा घालून पाय स्थिर ठेवावा. तसाच विळखा हातांचाही करावा आणि दोन्ही हातांची नमस्कार स्थिती करावी. अर्थात हा नमस्कार एखाद्या पक्षाच्या चोचीसारखा दिसेल. ही चोच गरूडासारखी होते म्हणून याला गरूडासन म्हणतात.

जसे डाव्या पायांनी हे आसन केले जाते तसेच उजव्या पायांनीही करावे. या आसनाच्या नियमित सरावामुळे हातपाय मजबूत होतात. पोटऱ्या दुखत असतील तर हे आसन जरूर करावे. पोटऱ्या व नितंबातील दुखण्याची तक्रार दूर होते. हे एक तोलात्मक आसन आहे. याशिवाय या आसनाला श्वासाचे बंधन नाही. म्हणजेच नेहमीचा स्वाभाविक श्वासोच्छवास सुरु ठेवावा. आठ ते दहा सेंकदापर्यंत हे आसन करावे. वृषणातील पेशींना सूज आली असल्यास या आसनाच्या सरावाने ती कमी होते. संधिवात कमी होतो. हातापायांच्या शीरा खेचल्या गेल्यामुळे त्यातील कार्यक्षमता वाढते. मन एकाग्र होते. उंची वाढण्यास मदत होते. म्हणून हे आसन लहान मुलांकडून नियमित करवून घ्यावे.

एखादी वेल मोठय़ा झाडाला विळखा घालून बसते त्याचपद्धतीने एका पायाचा दुसऱ्या पायावर अथवा हातांचा एकमेकांवर विळखा मजबूत असावा. अनेकदा यामध्ये तोल सावरता येत नाही. पण तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन करावे. आसन सोडताना हातांचा विळखा अथवा पीळ अगोदर सोडवून घ्यावा दोन्ही हात कंबरेशेजारी सरळ ठेवावे मग पायांचा पीळ सोडावा.
हात, पाय, कोपरे, मनगट, तळहात, बोटे यांचे स्नायू विशिष्ट दिशेने ताणले गेल्याने या स्नायूंचा रक्तपुरवठा वाढतो. याचाच उपयोग उंची वाढण्यासाठी होतो. स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन व अन्नरस मिळाल्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. अतिरिक्त मलसंचय दूर होऊन पोटाचे विकार बरे होतात. ज्यांचे हात-पाय अधू आहेत त्यांनी हे आसन करू नये. सांध्याची क्षमता वाढवण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने आसन करावे.

सुजाता गानू-टिकेकर, योगतज्ज्ञ