पंजाबमध्ये वाढत असलेल्या गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण रोखण्यासाठी पंजाब सरकारने युनिसेफच्या साथीत ४० हजार लसी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. अँटी ह्युमन पापिलोमा व्हायरस असे या लसीचे नाव आहे.

प्रकाशसिंग बादल यांनी यासंबंधी आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या रोखण्यासाठी पंजाब सरकारने मोठय़ा प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ही लसीकरण मोहीम पूर्णत: मोफत असणार आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्री बादल यांनी प्रसारमाध्यमांतूनही मोहीम राबविली आहे. राज्य आरोग्य आणि कल्याण विभागाचे सल्लागार डॉ. के. के. तलवार यांनी पहिल्या टप्प्यात भटिंडा आणि मानसा जिल्ह्य़ांतील दहा हजार मुलींना ही लस देण्यात येणार असल्याचे सांगितल्याची माहिती सचिव विनी महाजन यांनी दिली.

स्तनांच्या कर्करोगानंतर गर्भाशयाच्या कर्करोगाचा पंजाबमध्ये दुसरा क्रमांक लागतो. भटिंडा आणि मानसा जिल्ह्य़ांमध्ये गर्भाशयाच्या कर्करुग्णांचे प्रमाण अधिक आहे. लसीकरणाचा पहिला टप्पा नोव्हेंबरमध्ये राबविण्यात येणार आहे. जिल्हा आणि सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जगभरात दरवर्षी २.५ लाख महिलांचा कर्करोगामुळे मृत्यू होतो. तर भारतात ६७ हजार महिला कर्करोगामुळे मृत्युमुखी पडत आहेत.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)