वयाच्या १९ व्या वर्षी सावित्री यांचे लग्न २४ वर्षांच्या संजयरावांशी झाले. अगदी कांदे पोह्यांचा कार्यक्रमानंतर घरच्यांनी पसंती दिली होती. ६० वर्षांपूर्वीच्या त्या काळात अगदी १९ व्या वर्षी लग्न झाल्यामुळे सावित्री तशा बावरलेल्याच होत्या. संजयरावांनाही सावित्रीशी काय बोलावे ते कळत नव्हते. एकमेकांच्या आवडी निवडींनी बोलायला सुरुवात झाली आणि संसाराची गाडी एकमेकांच्या आवडी जपत पुढे जायला लागली.
यात अनेक लग्नात येतात तसे स्पीडब्रेकर, खड्डे आले पण त्यांनी आपल्या संसाराची गाडी कधी थांबू दिली नाही. गैरसमजांवर वंगण घालत, योग्य ती काळजी घेत त्यांनी एकत्र तब्बल ६० वर्षे संसार केला. त्यांच्यासाठी १४ फेब्रुवारी हा काही वेगळा दिवस नव्हता. पण आता त्यांनी हा दिवस साजरा करायचे ठरवले आहे.

सावित्री आणि संजय यांच्यासारखी अनेक जोडपी आजही आपल्या आसपास वावरत आहेत. ज्यांच्या काळात १४ फेब्रुवारी हा दिवस इतर दिवसांसारखाच एक होता. पण लग्न, संसार, कुटुंब, मुलं या व्यापात ते स्वतःला आणि पर्यायाने आपल्या जोडीदाराला वेळ द्यायला विसरले. अशी जोडपी आता या दिवसाशी जुळवून घेताना दिसत आहेत. आपणही हा दिवस तरुणांसारखाच साजरा करु शकतो असा त्यांचा ठाम विश्वास आहे. हा दिवस प्रत्येकजणच आपल्या पद्धतीने साजरा करतात, तसे आज या आजी आजोबांनीही त्यांच्या आगळ्या वेगळ्या पद्धतीने हा व्हॅलेंटाईन डे साजरा करायचे ठरवले आहे.

यावर्षी संजयराव, सावित्री यांना त्यांचे जिथे लग्न झाले त्या हॉलमध्ये घेऊन गेले. तेव्हा आई वडिल आणि मामा यांच्या मदतीने बोहल्यावर चढलेल्या सावित्री आज काठीच्याच सहाय्याने संजयरावांसोबत त्या हॉलमध्ये शिरत होत्या. हॉलमध्ये गेल्या ६० वर्षांत अनेक बदल झाले होते पण त्यांच्या आठवणीत मात्र तसूभरही बदल झाला नव्हता. उलट इतक्या वर्षांनी त्यांना या विस्मृतीत गेलेल्या आठवणी अचानक आठवल्यामुळे डोळ्यातले अश्रू काही थांबायचे नाव घेत नव्हते. सावित्रींच्या डोळ्यातले हे आनंदाश्रू पाहूनच संजयरावांना ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असे काहीसे वाटले असणार यात काही शंका नाही.

थोडावेळ तिकडे त्या हॉलमध्ये घालवून आणि तेव्हा आपण किती बावरलेले होतो अशी आठवण सांगत ते दोघंही मुलांच्या शाळेच्या परिसरात गेले. मुलांना योग्य शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी दोघांनीही अनेक शाळांच्या पायऱ्या घासल्या होत्या. आता दोन्ही मुलं आपआपल्या आयुष्यात स्थिरावली आहेत. पण त्यांना शाळेत प्रवेश मिळावा यासाठी केलेली तयारी ते एवढ्या वर्षांमध्ये विसरले नव्हते. तिकडे बालवाडीतल्या मुलांचे खेळणे, रडणे पाहिल्यावर त्यांना सायली आणि रोहितची आठवण झाली. तसा त्यांनी सायलीला आणि रोहितला फोनही केला. पण आपआपल्या कामात व्यग्र असल्यामुळे त्यांना फोन उचलणे शक्य झाले नाही. हातातला फोन बाजूला ठेवून ते परत त्या खेळणाऱ्या निरागस मुलांकडे पाहत राहिले. संपूर्ण शाळा रिकामी झाल्यावर त्यांनीही परतीचा रस्ता धरला.

ऑफिस सुटण्याच्या वेळेत रिक्षा मिळण्यासाठी त्यांनाही थोडीशी धडपड करावी लागली. पण १०-१५ मिनिटांच्या प्रयत्नांनी त्यांना रिक्षा मिळालीही. जाताना संजयरावांना वाटेत फूल विक्रेता दिसला. आठवणीने त्यांनी रिक्षा थांबवून सावित्रीसाठी एक गुलाब घेतले आणि आतापर्यंत दिलेल्या साथीबद्दल तिचे मनापासून आभार मानले. सावित्रींनीही मग लाजतच त्या गुलाबाचा स्वीकार केला. थोड्या वेळात त्यांची रिक्षा रुणानुबंध या वृद्धाश्रमाच्या दारापाशी थांबली. दाराकडे बघत त्यांनी मोठा उसासा टाकला आणि आत प्रवेश केला.