गरोदरपणात ‘ड’ जीवनसत्त्व असलेल्या औषधांचे सेवन केल्यास जन्मणाऱ्या मुलाला दमा आणि श्वसनासंबंधीचे आजार होऊ शकतात, असा दावा नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात केला आहे.

मुलांना अगदी लहान वयात दमा होण्यामागे गरोदरपणातील या औषधांचे सेवन हे एक महत्त्वाचे कारण असल्याचे लंडनमधील किंग्ज महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कॅथरिन हॉरेलोविक यांनी स्पष्ट केले.

‘ड’ जीवनसत्त्व असलेल्या औषधांचे आंतरराष्ट्रीय मानकांनुसार ४,४०० ड३चे तिसऱ्या महिन्यात प्रतिदिन सेवन करणे धोकादायक ठरते. हे प्रमाण डॉक्टरांच्या शिफारशींनुसार ४०० इतके असेल, तर नवजात बालकाला दम्यापासून वाचविणे शक्य आहे. या अभ्यासासाठी निवडण्यात आलेल्या गर्भवतींनी १० ते १८ आठवडे कमीअधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाचे सेवन केले होते. संशोधकांनी ५१ गरोदर महिलांच्या गर्भनलिकेतील रक्ताची चाचणी केली. त्याचप्रमाणे नवजात बालकाच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक प्रणालीची आणि रक्ताचीही तपासणी केली. अधिक प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाचे सेवन करणाऱ्या महिलांनी जन्म दिलेल्या मुलांमध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाणही अधिक प्रमाणात आढळले.

अशा वेळी मुलाचा जन्म झाल्यानंतर लगेचच नैसर्गिक रोगप्रतिकारक प्रणालीने जोरदार प्रतिकार केल्यास दमा वेळीच रोखला जाणे शक्य आहे. मात्र, ही रोगप्रतिकारक प्रणाली संथ राहिल्यास मुलांना दम्याचा आजार होऊ शकतो, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.