रिलायन्स जिओ आणि त्याबरोबरच बाजारात सुरु असलेल्या स्पर्धेत आपला टिकाव लागावा यासाठी टेलिकॉम कंपन्या एकाहून एक ऑफर्स जाहीर करत आहेत. नुकताच व्होडाफोननेही आपला नवा प्लॅन लाँच केला असून यामध्ये यूजर्सला जास्तीत जास्त डेटा मिळणार आहे. ३९९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये युजरला ९० जीबी इतका ४ जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.

व्होडाफोनचा ३९९ रुपयांचा प्लॅन याआधीही होता. मात्र आताच्या नवीन प्लॅनमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. नवीन प्लॅनमुळे नवीन ग्राहक व्होडाफोनकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. याशिवाय रिलायन्स जिओ ३९९ रुपयात ८४ दिवसांसाठी ८४ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग देत आहे. तर त्यांनी या प्लॅनवर १०० टक्के कॅशबॅक ऑफरही जाहीर केली आहे. या प्लॅनला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने ही ऑफर आणली आहे.

देशातील दुसरी मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होडाफोनतर्फे जुलैमध्ये ग्राहकांना ४ जीचा ७० जीबीचा डेटा प्लॅन देण्यात आला होता. हा प्लॅन केवळ २४४ रुपयांना असून ७० दिवस प्रत्येक दिवशी १ जीबी इतका डेटा ग्राहक वापरु शकणार होते. हाय-स्पीड डेटाबरोबरच अनलिमिटेड कॉलिंगचीही सुविधा देण्यात आली होती. याशिवाय नुकतीच व्होडाफोनने आणखी एक ऑफर जाहीर केली होती. यामध्ये कंपनी आपल्या पोस्टपेड युजर्सना ६० जीबी डेटा मोफत देणार आहे. ही ऑफर सर्व ‘व्होडाफोन रेड’ युजर्ससाठी असेल असे कंपनीने सांगितले आहे. या ऑफरमध्ये युजर्सना सहा महिन्यांसाठी प्रत्येकी १० जीबी असा एकूण ६० जीबी डेटा मोफत मिळेल. व्होडाफोन रेड प्लॅन ४९९ रुपयांपासून सुरु होतो. ज्यामध्ये मोफत डेटाशिवाय आणखी ५ जीबी डेटा दिला जाणार आहे. व्होडाफोनच्या ३९९ रुपयांच्या नव्या प्लॅनमुळे जिओ आणि एअरटेलला स्पर्धा निर्माण झाली आहे.