चालणे व्यायाम म्हणून चांगले असते, त्यामुळे दिवसातील ठराविक वेळ प्रत्येकाने चालायला हवे असे आपण अनेकदा ऐकतो आणि वाचतोदेखील. मग सकाळच्या वेळात, जेवणानंतर चालल्यास ते जास्त फायदेशीर ठरते असेही म्हटले जाते. मात्र चालण्याचा व्यायाम इतरही काही कारणांसाठी फायदेशीर ठरु शकतो. तुम्ही काम करुन कंटाळला असाल आणि तुम्हाला थोडा आराम हवा असेल तर चालणे हा उत्तम उपाय ठरु शकतो. चालण्यामुळे विविध कारणांनी निर्माण होणारा ताण कमी होण्यास मदत होते. त्यामुळे चालणे सुरु करा आणि काय आहेत त्याचे फायदे जाणून घ्या…

१. मधुमेहावर उपयुक्त

टाईप २ मधुमेहासाठी चालण्याचा व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतो. दररोज ठराविक प्रमाणात चालण्याचा व्यायाम केल्यास रक्तातील साखरेची पातळी समतोल राहण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी आपले वजन कमी किंवा जास्त असले तरीही न चुकता व्यायाम करणे आवश्यक आहे.

२. मेंदू तल्लख होण्यासाठी फायदेशीर

मेंदूच्या पेशी कार्यन्वित होण्यासाठी चालण्याचा व्यायाम अतिशय उपयुक्त ठरतो. मेंदू तल्लख झाल्यामुळे त्याचा अनेक बाबतीत फायदा होतो. त्यामुळे इतर शारीरिक त्रास शोधणेही सोपे जाते.

३. दिर्घायुष्यासाठी उपयुक्त

चालण्यामुळे तुमच्या शरीरातील सर्व यंत्रणा उत्तमपद्धतीने कार्यरत राहतात. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढण्यासाठीही चालणे अतिशय उपयुक्त असते. नियमित चालण्याचा व्यायाम करणारे लोक अतिशय त्यांच्या वयापेक्षा कमी वयाचे दिसतात. त्यांच्यात कमी वयात मृत्यू होण्याचे प्रमाणही अत्यल्प असते.

४. वजन वाढण्यास प्रतिबंध

चालण्याच्या व्यायामामुळे वजन वाढण्यावर काही प्रमाणात निर्बंध येतात. याशिवाय वाढलेले वजन कमी करण्यासाठीही चालण्याचा अतिशय उपयोग होतो. शरीरातील मेटाबॉलिझम संतुलित ठेवण्यासाठी चालण्याचा फायदा होतो. चालण्यामुळे शरीरातील चरबी कमी होण्याबरोबरच स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते.

५. ताण दूर करण्यासाठी फायदेशीर

चालण्याचा शरीरातील हॉर्मोन्सवर चांगला परिणाम होतो. चालण्यामुळे हे हॉर्मोन्स अॅक्टीव होतात आणि तुम्ही नकळत फ्रेश झाल्यासारखे वाटते. त्यामुळे कामाचा किंवा इतर कोणताही ताण कमी करायचा असले तर चालणे हा अतिशय सोपा उपाय आहे. तसेच चालण्यामुळे डोक्यातील नकारात्मक आणि ताण वाढविणारे विचार कमी होतात आणि तुम्हाला काही प्रमाणात आनंदी वाटू लागते.

म्हणूनच चालणे हा व्यायामाचा अतिशय सोपा असा प्रकार म्हणता येऊ शकतो. यामुळे शरीर आणि मन या दोन्हींवर चांगला परिणाम होतो. आरोग्यदायी आयुष्य जगण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार दिवसातील केवळ अर्धा तास चालल्यास ते निश्चितच फायदेशीर ठरु शकते. ज्यांना व्यायामासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही अशांनी दैनंदिन कामे करताना, ऑफीसला जाताना चालावे. यामध्येही वय आणि त्या व्यक्तीची प्रकृती यांनुसार चालण्याचा वेग, कालावधी ठरविल्यास उत्तम.