बहुतेक आजार हे दूषित पाण्यामुळे होतात. त्यामुळे नेहमी स्वच्छ व शुद्ध पाणी प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देतात. मात्र अनेक विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये पाण्याचे शुद्धीकरण क्वचितच केले जाते. मात्र आता शास्त्रज्ञांनी पाण्याच्या शुद्धीकरणाची सोपी व कमी खर्चीक पद्धत शोधून काढली आहे. ग्राफिन ऑक्साइड आणि सूर्यप्रकाश यांच्या साहाय्याने पाण्याचे शुद्धीकरण करण्यात येणार आहे.  वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधक यावर संशोधन करत आहेत. या संशोधकांच्या गटातील प्रा. श्रीकांत सिंघमनेनी यांनी सांगितले की, या पद्धतीनुसार दूषित पाणी शुद्ध आणि पिण्यायोग्य करण्यात येणार आहे. त्याचा उपयोग अनेक विकसनशील आणि अविकसित देशांना होणार आहे. भारतासह मुबलक सूर्यप्रकाश असणाऱ्या अनेक देशांसाठी ही पद्धत फायदेशीर आहे. दूषित पाणी घेऊन जर त्याचे शास्त्रज्ञांनी सांगितलेल्या पद्धतीने बाष्पीभवन केल्यास पाण्याचे शुद्धीकरण होऊ शकते, असे सिंघमनेनी यांनी सांगितले.

ही पद्धती अत्यंत सुलभ असल्याचे सिंघमनेनी म्हणाले. त्यासाठी ग्राफेन ऑक्साइडचा उपयोग करण्यात आला आहे. ग्राफेन ऑक्साइडच्या सपाट भागाचा बॅक्टेरियानिर्मिती करणाऱ्या सेल्युलोजसोबत वापर करून एक बायोफोम तयार करण्यात आला आहे. या बायोफोमद्वारे पाणी शुद्ध होत असल्याचे सिंघमनेनी यांनी सांगितले.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)