व्हॉट्स अॅप हे अॅप्लिकेशन जणू आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. फोटो किंवा फाईल पाठवणं, लोकेशन शेअर करणं, फोन किंवा व्हिडिओ कॉलिंग करणं अशा अनेक गोष्टी व्हॉट्सअॅपमुळे सहज शक्य झाल्यात. व्हॉट्स अॅप लोकांच्या गरजा लक्षात घेऊन दिवसेंदिवस वेगवेगळ्या फीचरचा समावेश करत आहे. गेल्या आठडाभरात व्हॉट्स अॅपमध्ये तीन नवीन फीचरचा समावेश करण्यात आला. आता व्हॉट्स अॅप अधिक सुलभ व्हावे आणि व्यावसायिकांना उपयोगी पडावं असं महत्त्वाचं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लवकरच युजर्सना व्हॉट्स अॅपवर ऑडिओ कॉन्फरन्स कॉल करता येणार आहे.

तुम्ही व्हॉटसअॅप ग्रुपचे अॅडमिन आहात? हे नक्की वाचा

व्हॉट्स अॅप वापरणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक असली तरी प्रतिस्पर्धी अॅपमध्ये असणारी अनेक युनिक फीचर मात्र व्हॉट्स अॅपमध्ये नाहीत. म्हणूनच व्हॉट्स अॅपने गेल्यावर्षभरापासून अधिकाअधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हिडिओ कॉलिंग’, ‘जीआयएफ’, ‘स्टेटस अपडेट’, ‘लाईव्ह लोकेशन’, ‘नोटिफिकेशन’ अशा अनेक फीचरचा समावेश केला. यावेळी व्हॉट्स अॅप ऑडिओ आणि व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल हे नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरमुळे एकावेळी अनेक लोकांशी बोलता येणं शक्य होणार आहे. इंटरनेटच्या जास्तीत जास्त वापरामुळे युजर्सची ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलला तुफान प्रसिद्धी लाभली आहे, त्यामुळे व्हॉट्स अॅपचे नवे कॉन्फरन्स कॉलिंगचे फीचरही तितकेच प्रसिद्ध होईल, अशी आशा व्हॉट्स अॅपला आहे.

गेल्या आठवड्यात व्हॉट्स अॅपने लाईव्ह लोकेशन शेअरिंगचे फीचर अपडेट केले. या फिचरमुळे युजर्स आपले लाईव्ह लोकेशन मित्र- मैत्रिणींना पाठवू शकतात. युजर्सच्या सुरक्षेसाठी याचा खूप फायदा होईल, असं व्हॉट्स अॅपने म्हटलं होतं. त्याचबरोबर आणखी एक फीचर व्हॉट्स अॅपने उपलब्ध करून दिलं आहे. या फीचरमुळे जर एखाद्या युजरनं आपला नंबर बदलला तर त्याची माहिती त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या इतर युजर्सनादेखील मिळणार आहे.