स्नॅपस्टोरी, इंस्टास्टोरीप्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपनेही अलीकडेच ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी’ हे नवीन फीचर सुरू केलं आहे. सोशल मीडियावर पडीक असणाऱ्या तरुणाईला मात्र हे फीचर अजिबात आवडलेलं नाही.

चांगल्या आरोग्यासाठी दिवसाची सुरुवात चांगली असावी लागते असं म्हणतात. बरं ही ‘चांगली सुरुवात’ करण्याचे सगळ्यांचे मार्गही वेगवेगळे असतात. कोणी सांगतं भरपूर पाणी प्या, काहीजण व्यायामाला महत्त्व देतात. फक्कड चहा हा बहुतेक सगळ्यांसाठीच दिवसाची चांगली सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग आहे. अर्थात या सगळ्या मार्गाविषयी कोणा ना कोणाचं दुमत असणं साहाजिक आहे, पण सध्याच्या घडीला एक शिस्त प्रत्येकाने स्वत:ला लावून घेतली आहे आणि ही शिस्त हमखास दिवसाची उत्तम सुरुवात करून देते. ती म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप तपासणं. २४ फेब्रुवारीच्या सकाळीही नियमितपणे सकाळी मोबाइल हातात घेतल्यावर पहिल्यांदा एक मेसेज आला. ‘इंस्टास्टोरी, स्नॅपचार्ट स्टोरीसारखं व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी आलंय. तुमचं अपडेट झालं का?’ हल्ली स्वत:ला ‘अपडेट’ ठेवण्यापेक्षा अ‍ॅपला अपडेट ठेवणं गरजेचं असतं. त्यामुळे रात्रीच्या मिट्ट काळोखात जेव्हा सगळे प्राणिमात्र झोपलेले असतात, तेव्हा वायफायच्या मदतीने अ‍ॅप्स स्वत:च्या अपडेटीपणाचा सोहळा गुपचूप पार पाडतात. त्या रात्रीही व्हॉट्सअ‍ॅपने आपलं काम न चुकता केलं होतं, त्यामुळे हे अपडेट मोबाइलवर आले होते. त्यामुळे वरच्या प्रश्नाचं मत्रिणीला ‘हो’ असं उत्तर देण्याआधीच या अपडेटबद्दल समीक्षण, तक्रारी, आनंद, प्रश्न, नाराजी, बेफिक्री असे वेगवेगळे सूर वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये उमटू लागले. त्यामुळे या नव्या ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी’ प्रकरणाबाबतचं कुतूहल वाढू लागलं.
व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचं मूळ
तसं हल्ली या सोशल अ‍ॅप्सचे अपडेट्स आणि त्यातील नवीन फीचर्स हे काही नवं नाही. काही फीचर्स लोकांना आवडतात, काही नाही. हे रोजचं प्रकरण चालूच असतं. पण या फिचरने लोकांचं लक्ष वेधलं. हे फिचर समजून घेण्यासाठी आधी व्हॉट्सअ‍ॅप समजून घ्यावं लागेल. या अ‍ॅपचं वैशिष्टय़ त्याच्या नावातच आहे. व्हॉट्स अप म्हणजेच ‘काय चाललंय?’ एखाद्याला भेटल्यावर किंवा फोनवर बोलताना सहज विचारला जाणारा प्रश्न. व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचा उगम झाला या प्रश्नापासूनच. एरवी एखाद्या मीटिंगमध्ये, गाडी चालवताना फोन उचलता येत नाही. मग समोरच्याला आपण काय करतोय हे सांगायचा एकमेव मार्ग म्हणजे मेसेज पाठवणे. पण हेही कित्येकदा शक्य होत नाही. त्यावर तोडगा म्हणून अमुक एका ठिकाणी असल्याने तुम्हाला फोन उचलता येणार नाही, हे स्टेट्स टाकायची सुविधा मिळू लागली. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्सचा उघडल्यावर ‘जिममध्ये आहे’, ‘झोपलोय’, ‘आता बोलू शकत नाही, व्हॉट्सअप करा’, ‘मीटिंगमध्ये आहे’, असे वेगवेगळे स्टेट्सचे पर्याय दिलेले होते. अगदी तुमच्या फोनची बॅटरी संपल्याने फोन बंद करत आहात, ट्रेकच्या ठिकाणी नेटवर्क नसल्याने चार दिवस संपर्कात नसाल, परीक्षा असल्याने फोन बंद ठेवणार आहात, हे आणि असं बरंच काही स्टेट्सच्या माध्यमातून इतरांना सांगता यायचं. त्यानंतर या स्टेट्सचा वापर कवितेच्या ओळी, कोट्स, स्वत:चे विचार मांडण्यासाठीही होऊ लागला. आता त्या जागी तुम्हाला सध्या काय करताय याचा प्रत्यक्ष फोटो किंवा व्हीडिओ शूट करून टाकू शकता. हा फोटो २४ तासांसाठी स्टेट्स स्वरूपात राहतो. त्यानंतर नवं स्टेट्स टाकायचं. अर्थात दिवसभरात तुम्हाला हवी ती स्टोरी तुम्ही टाकू शकता. ही स्टोरी कोण बघतंय, याचे तपशील तुम्हाला स्टोरीखाली मिळतात. तुम्हालाही विशिष्ट व्यक्तीलाच स्टोरी दाखवायची असल्यास तीही सुविधा त्यात आहे. तसेच एखाद्याला या स्टोरीबद्दल काही बोलायचे असल्यास तो थेट तुमच्या वैयक्तिक चॅट िवडोवर मेसेज पाठवू शकतो.
स्नॅपस्टोरी, इंस्टास्टोरी आणि..
वरवर पाहता या व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीच्या नव्या प्रयोगाबद्दल कुतूहल वाटू शकतं. पण तरुणाईने मात्र या प्रयोगाबद्दल नापसंती दर्शवली. याचं मुख्य कारण म्हणजे हा प्रयोग त्यांच्यासाठी नवा नाही. हीच सुविधा देणारं तरुणाईचं लाडकं अ‍ॅप स्नॅपचॅट आधीच त्यांच्या मोबाइलमध्ये आहे. त्यावर अगदी पार्टी फोटोजपासून दर्देदिल प्रेमी जिवांच्या व्यथांना वाट मिळते. बाथरूम सिंगर नावाची संकल्पना आपल्याला ठाऊक आहेच, पण या स्नॅपस्टोरीमुळे ‘ड्रायिव्हग सिंगर’ची जातकुळी जन्माला येऊ लागली. ट्राफिकमध्ये अडलेला, गाडीत हॉर्न वाजवून थकलेला जीव एखादं गाणं रेकॉर्ड करून स्नॅपस्टोरीच्या स्वरूपात टाकू लागला. कुत्र्याचं नाक, मांजरीचे डोळे, सशाचे कान हे या प्राण्यांवरच नाही, तर माणसांवरही छान दिसतात, हे स्नॅपचॅटने दाखवून दिलं. तोंडातून निघणारं इंद्रधनुष्य, फुलांचा मुकुट, विचित्र प्रकारे रंगविलेले चेहरे ‘कुल’ दिसू शकतात हे स्नॅपस्टोरीने पटवून दिलं. मल्लिका दुवाची मेकअप दीदी, पम्मी आंटीसारख्या कित्येकांना या स्टोरीजमुळे सेलेब्रिटी पद मिळालं.

त्यानंतर यांच्या पावलावर पाउल ठेवत इंस्टाग्रामनेही इंस्टास्टोरी नावाचं फिचर आणलं. त्याची प्रक्रियाही हीच आहे. त्यामुळे पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीच्या माध्यमातून हेच फिचर अनुभवायला तरुणाई उत्सुक नाही. अर्थात यांच्यातील साधम्र्य या एकाच कारणासाठी हे फिचर नाकारलं गेलं नाही. कारण एरवी चार फीचर्ससाठी वेगवेगळी अ‍ॅप्स घेण्यापेक्षा एका अ‍ॅपमध्ये सगळे फीचर्स मिळणं कधीही उत्तम. त्यामुळेच व्हॉट्सअ‍ॅपच्या याआधीच्या व्हिडीओ कॉिलग, व्हॉट्सअ‍ॅप कॉल या फीचर्सना सगळ्यांनी उचलून धरलं. पण व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीला नाकारण्यामागे तरुणाईची दुखरी बाजूही आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सगळेच करतात. तरुणाईचंच नाही तर आबालवृद्धांचं हे लाडकं अ‍ॅप आहे. मित्र, ऑफिसचे सहकारी आणि वरिष्ठ, नातेवाईक सगळ्यांकडे व्हॉट्सअ‍ॅप असतं आणि ते त्याचा रोज वापरही करतात. त्या मानाने स्नॅपचॅट ही फक्त तरुणाईची मक्तेदारी आहे. यावर ज्येष्ठांचा वावर नाही. कित्येकांना हे अ‍ॅप कसं वापरावं याची कल्पनाच नाही. त्यामुळे पार्टीचे, कपल्सचे लेक्चर बुडवून केलेल्या पार्टीचे फेसबुकवर टाकता न येणारे फोटो स्नॅपचॅटवर टाकता यायचे. बरं हे फोटो २४ तासाने निघून जायचे. त्यामुळे पुढे-मागे कधीतरी हे फोटो कोणाच्या हाती लागायचा प्रश्न नाही. पण व्हॉट्सअ‍ॅपवर हे करता येणार नाही.
व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स गेल्याची नाराजी
व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी हे नवं फिचर आणताना व्हॉट्सअ‍ॅपने मूळ स्टेट्स ही संकल्पना काढली, याचाही राग कित्येकांना आहे. ‘मी स्नॅपचॅट वापरत नव्हते. त्यामुळे हे नवं फिचर माझ्यासाठी असून नसल्यासारखं आहे. पण स्टेट्स टाकता येणार नाही, याचं वाईट वाटतंय,’ असं मुंबईची प्रियांका पाटील सांगते. पुन्हा ही स्टोरी २४ तासांत जाणार म्हणजे परत नवी स्टोरी टाकायचा खटाटोप रोजचा आहे. स्टेट्स मात्र एकदा टाकल्यावर नवं काही सुचेपर्यंत त्याच्याकडे बघायची गरज नसायची. ‘मला नव्या फिचरचं कौतुक नाही, पण व्हॉट्सअ‍ॅपने स्टेट्सची सुविधा काढायला नको होती. तिथे आम्हाला हवं तसं व्यक्त होण्याची संधी मिळायची. आता ते मिळणार नाही, याचा राग आहे,’ असं सोनाली नाईक सांगते.
पण काहीही असलं तरी २४ फेब्रुवारीपासून गेल्या दोन आठवडय़ांमध्ये व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीमध्ये कित्येकांना एकतरी स्टोरी टाकायचा मोह आवरता आला नाही. यात अगदी सुरुवातीपासून नकाराचा सूर आवळणाऱ्यांचाही समावेश आहेच. विशेष म्हणजे इतके दिवस या फिचरबद्दल काहीही न माहिती असलेल्या ज्येष्ठांना याबद्दल जास्त उत्सुकता आहे. आतापर्यंत आई-वडिलांना फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप वापरायला शिकवून निर्धास्त झालेल्या तरुण मंडळींवर या फिचरबद्दलच्या अनेक प्रश्नांचा भडिमार झालाच. कारण ‘हा फोटो कसा टाकायचा?’ ‘माझे कालचे फोटो कसे उडाले?’ ‘मावशीचे फोटो लाईक नाही का करता येणार?’ ‘नुसते फोटो टाकून काय उपयोग?’ अशा कित्येक शंकाकुशंकांचा भडिमार सध्या घराघरांत चालू आहे. त्यात ‘एकदा आईला हे फिचर कळलं तर ती स्नॅपचॅटवर पण आली तर?’ या नव्या भीतीनेही जन्म घेतला आहेच.

विनोदाची लाट
व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीचा अपडेट आल्याबरोबरच या फिचरविरोधी अनेक विनोद, मेमेज यांची अख्खी लाट ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आली. व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स परत आणण्याची मागणी जोर धरू लागली. ‘स्नॅपचॅटस्टोरी कॉलेजवयीन मुलांसाठी, इंस्टास्टोरी तरुणांसाठी तर व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी ज्येष्ठांसाठी आहे,’ ‘स्नॅपचॅट स्टोरीचं संस्कारी व्हर्जन म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप स्टोरी,’ ‘स्नॅपचॅट, इंस्टाग्रामनंतर आता ट्वीटरची नक्कल करत आता व्हॉट्सअ‍ॅपवर फक्त १४० अक्षरांचा मेसेज पाठवता येईल, असं फिचर येईल,’ अशा आशयाचे अनेक विनोद सोशल मीडियावर येऊ लागले. या सगळ्याचा परिणाम म्हणून व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स पुन्हा एकदा व्हॉट्सअ‍ॅप टॅगलाइन स्वरूपात येणार असल्याचंही बोललं जात आहे. पण अजूनही व्हॉट्सअ‍ॅपकडून त्याची अधिकृत घोषणा झाली नाही. तोपर्यंत तरी व्हॉट्सअ‍ॅप स्टोरीवरच समाधान मानावं लागेल.
सौजन्य – लोकप्रभा
response.lokprabha@expressindia.com