मोबाईलच्या बाजारात आघाडीवर असलेल्या शिओमी कंपनीचा आणखी एक फोन आज बाजारात दाखल झाला आहे. मागील काही महिन्यांपासून शिओमी कंपनीच्या फोनला ग्राहकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात स्मार्टफोन उपलब्ध असल्याने एमआयच्या खपात बरीच वाढ झाली. चीनमध्ये सर्वाधिक विक्रीचा टप्पा गाठल्यानंतर शिओमी भारतीय बाजारपेठेत सॅमसंगलाही टक्कर देताना दिसत आहे. या फोनची बॅटरी आणि विविध आकर्षक फिचर्स ग्राहकांना भुरळ घालत असल्याचे म्हणता येईल.

असे असतानाच कंपनी आज आपला MI Mix 2 हा फोन लाँच करणार आहे. याआधी कंपनीने आपला MI Mix 1 हा फोन लाँच केला होता. दिल्लीतील एका इव्हेंटमध्ये कंपनीने आपला हा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. लाँचिंगसोबतच या फोनवर ग्राहकांना अनेक आकर्षक ऑफर्स मिळण्याचीही शक्यता आहे. शिओमीने हा स्मार्टफोन चीनमध्ये गेल्या महिन्यात लाँच केला होता, त्यानंतर आता तो भारतात लाँच करण्यात येत आहे.

५.९९ इंच आकाराच्या स्क्रीनसह या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगन ८३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. १२ मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा हे फीचर्स यामध्ये असण्याची शक्यता आहे. या फोनची किंमत भारतात ३० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. हा मिड प्रीमियम स्मार्टफोन असण्याची शक्यता आहे. चीनमध्ये हा फोन रॅम आणि स्टोरेज आधारावर वेगवेगळ्या तीन व्हेरिएंटवर लाँच करण्यात आला आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत जवळपास ३२ हजार ३०० रुपये , ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत जवळपास ३५ हजार ३०० रुपये, तर ६ जीबी रॅम आणि २५६ जीबीच्या फोनची किंमत जवळपास ३९ हजार २०० रुपये आहे.